प्रतिभावंत हा नव्या सृष्टीचा निर्माता वि.दा. पिंगळे. समीक्षा प्रकाशन प्रकाशित, मा. व्यंकटेश देशमुख लिखित काव्यतरंग या कवितासंग्रहाचे प्रकाशन
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे कार्यवाह वि.दा. पिंगळे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेचे संस्थापक मा.रतनजी माळी, संस्थेचे अध्यक्ष सौ स्मिता वाघ ,प्रसिद्ध साहित्यिक प्रा. विजय लोंढे, यशोदीप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.अजय शिखरे याप्रसंगी उपस्थित होते.
कवी व्यंकटेश देशमुख यांनी कविता लेखना मागची आपली भूमिका विशद करताना ते असे म्हणाले, घरातून शिक्षणाचे व वाचनाचे. बाळकडू मला मिळाले त्यामुळे विद्यार्थी दशेपासून वाचनाची आवड होती. पुढे सामाजिक चिंतन करीत असताना समाजाचे काही प्रश्न मी लहान लहान चारोळ्या कवितेतून व्यक्त करू लागलो आणि आज पहिला कवितासंग्रह प्रकाशित होतो आहे याचा विशेष आनंद आहे.
याप्रसंगी प्रा. विजय लोंढे यांनी देखील कवितेची व्याख्या सांगून कविता लेखना मागची प्रत्येक कवीची भूमिका काय असते हे विशद केले. वि.दा. पिंगळे यांनी सविस्तर विवेचन करताना ते असे म्हणाले की, मराठीमध्ये 700 वर्षाहून अधिक समृद्ध परंपरा कवितेला आहे. कोणताही कवी स्वतःसाठी कविता लिहत नाही तर तो समाजाचा एक जागल्या असतो.
कवी हा समकालीन मूल्य पकडतो आणि आपल्या कवितेतून आपल्या लेखनातून ते मांडत असतो .समाज हीच साहित्याची जन्मभूमी असते. आणि समाजाच्याच झाडाला साहित्याची नक्षत्रफुले येत असतात. मराठी कवितेने प्रत्येक टप्प्यावर एक वळण घेत आपले वेगळेपण टिकून ठेवलेले आहे. अनेक कवी कवयित्रींनी आपल्या प्रतिभेतून मराठी कवितेचा आयाम अधिक समृद्ध करण्याचे काम केले आहे. आज कवी ,लेखक व विचारवंत यांचे मौन अधिक मला धोकादायक वाटते.
आज सामाजिक व राजकीय परिस्थिती अतिशय गढूळ झालेली दिसून येते, अशा काळामध्ये साहित्यिक विचारवंतांना ठाम भूमिका घ्यावी लागेल. कारण प्रतिभावंत हा नव्या सृष्टीचा निर्माता असतो, समाजात जेव्हा वैचारिक अंधार निर्माण होतो त्यावेळेस आपल्या प्रतिभेतून तो नवा आशेचा प्रकाश समाजामध्ये निर्माण करतो.
आज ही मोठी जबाबदारी साहित्यिक आणि विचारवंतांच्या खांद्यावर आहे .व्यंकटेश देशमुख यांची कविता एक परिपूर्ण आणि समृद्ध कविता मला वाटते. ते 30-35 वर्षापासून कविता लेखन करीत आहेत पण त्यांनी कवी म्हणून मिरवण्यासाठी कवितासंग्रह प्रकाशित करण्याची घाई केली नाही. तर आपली कविता जेव्हा समृद्ध झाली असे त्यांना वाटले तेव्हा त्यांनी पहिला कवितासंग्रह प्रकाशित केला.
त्यांच्या कवितेत मला ना.धा.महानोर यांचा निसर्ग दिसतो. नामदेव ढसाळ यांचा विद्रोह दिसतो, माधव ज्युलियन, मंगेश पाडगावकर यांची तरल भावना दिसून येते. अतिशय वाचनीय असा हा कवितासंग्रह आहे ,अशी भूमिका वि.दा. पिंगळे यांनी व्यक्त केली. सौ स्मिता वाघ यांनी देखील आपले विचार याप्रसंगी व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक रतनजी माळी यांनी आमच्या संस्थेत असा साहित्यातला हिरा आहे याचे संस्थेला मोठे कौतुक आणि अभिमान आहे असे उद्गार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शौनक कंकाळ यांनी केले. कविता संग्रहाचे प्रकाशन झाल्यानंतर सुप्रसिद्ध गझलकार मसूद पटेल यांचा अध्यक्षतेखाली कवी संमेलन देखील संपन्न झाले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. विजय अंधारे यांनी केले. यशोदीप माध्यमिक विद्यालय वारजे पुणे या विद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी अनेक रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गौरव देशमुख यांनी केले…