अहिल्यानगर जिल्ह्यात टीईटीसाठी 15791 परीक्षार्थी, 10 नोव्हेंबरला परीक्षा

0
222

जामखेड न्युज——

अहिल्यानगर जिल्ह्यात टीईटीसाठी 15791 परीक्षार्थी, 10 नोव्हेंबरला परीक्षा

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यात पहिला पेपर सकाळी 10.30 ते दुपारी 1 व दुसरा पेपर दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे.

जिल्हा स्तरावर जिल्हा परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी व जिल्हा परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे नियंत्रण अधिकारी व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हे सहनियंत्रण अधिकारी व उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) हे जिल्हा परीरक्षक व उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची सहायक जिल्हा परीरक्षक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.

या परीक्षेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पेपर क्रमांक 1 साठी 6 हजार 373 परीक्षार्थी व पेपर क्रमांक 2 साठी 9 हजार 418 परीक्षार्थी असे एकूण 15 हजार 791 परीक्षार्थी परीक्षेस बसणार आहेत.

अहिल्यानगर शहर व शहरालगत पेपर क्रमांक 1 साठी 17 व पेपर क्रमांक 2 साठी 28 परीक्षा केंद्र निश्चित केलेले आहेत. या परीक्षेसाठी पेपर क्रमांक 1 साठी 4 झोनल अधिकारी, 17 सहायक परीरक्षक, 17 केंद्रसंचालक, 60 पर्यवेक्षक व 271 समावेक्षक आणि पेपर क्र.2 साठी 6 झोनल अधिकारी, 28 सहायक परीरक्षक, 28 केंद्रसंचालक, 80 पर्यवेक्षक, 400 समावेक्षक यांची नियुक्ती केलेली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत परीक्षार्थीची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीव्दारे करण्यात येणार असून परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक परीक्षा दालनात, केंद्राच्या प्रवेशव्दारावर व केंद्र संचालक यांचे नियंत्रण कक्षात सी.सी.टी.व्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

सर्व परीक्षार्थीना पेपरच्या वेळेआधी दीड तास परीक्षा कक्षात उपस्थित राहायचे आहे. उशिरा आलेल्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे कळवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here