निवडणुकीच्या रणांगणात नवरा बायको एकमेकाच्या विरोधात

0
1866

जामखेड न्युज——

निवडणुकीच्या रणांगणात नवरा बायको एकमेकाच्या विरोधात

 

विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यातील राजकीय समीकरणं बदलत आहेत. अनेक नेते पक्षांतर करत आहेत. अशातच भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाकडून संजना जाधव छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड विधानसभा निवडणुक लढवणार आहेत.

ही जागा शिंदे गटाच्या वाटेला आली आहे. शिंदे गटाकडून त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय समीकरणं बदलली आहेत.

संजना जाधव या भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या त्या विभक्त पत्नी आहेत. कन्नड तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.

भाजपकडून लढण्यासाठी संजना जाधव या प्रयत्न करत होत्या. मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिंदे गटाच्या वाट्याला आली. त्यामुळे संजना जाधव या शिंदे गटात प्रवेश करून निवडणूक लढणार आहेत.यंदा कन्नडमध्ये आपल्याला हर्षवर्धन जाधव विरुद्ध संजना जाधव यांच्या रुपाने नवरा विरुद्ध बायको अशी लढत पहायला मिळण्याची चिन्हे आहेत.

2009 मध्ये हर्षवर्धन जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार म्हणून कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले . 2014 मध्ये त्यांनी सलग दुस-यांदा या जागेवर विजय मिळवला. जाधव यांनी 2019 मध्ये संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यांचा पराभव झाला मात्र त्यांनी लक्षणीय मतं घेतली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचं डिपॉजिट जप्त झालं होतं.

कन्नड विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत रिंगणात आहेत. त्याशिवाय अपक्ष उमेदवार मनोज पवार यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला आहे. आता सगळ्यांमध्ये दानवेंच्या कन्या संजना धनुष्यबाणाद्वारे विजयाचा वेध घेणार का? की हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here