जामखेड न्युज – – – – –
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचा मोठा फटका कोकण रेल्वेलाही बसला आहे. तसेच चिपळूण, बावनदी आणि खेड येथे पूर आल्याने मुंबई – गोवा महामार्ग बंद आहे. रेल्वे आणि रस्ता वाहतूक ठप्प पडली आहे. तर चिपळूणला पुराच्या पाण्याने वेढले आहे. हजारो लोक अडकले आहे. दरम्यान पूराच्या पाण्यात अडकलेल्या या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम पाठवण्यात आली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगेला पूर आल्याने येथेही एनडीआरएफची टीम पोहोचली आहे.
*रेगावजवळ 3 कर्मचारी रेल्वे पोलवर अडकले*
मुसळधार पावसामुळे वांगणी आणि बदलापूर दरम्यान रेल्वे रुळावर तसंच कल्याण-कर्जत हायवेवर पाणी साचले आहे. याठिकाणी गोरेगावजवळ 3 कर्मचारी रात्री 2 वाजल्यापासून रेल्वे पोलवर अडकून पडले होते. थोड्याच वेळापूर्वी या तिघांची सुटका करण्यात यश आलंय. विशेष म्हणजे रात्री दोन पासून हे कर्मचारी अडकून पडलेले असताना एकही रेल्वे अधिकारी मदतीसाठी आला नाही. अखेर स्वत:हूनच पाण्याचा अंदाज घेत हे कर्मचारी पाण्यातून सुखरूप बाहेर पडले.
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाटे पासून अधून मधून पावसाच्या मोठ-मोठ्या सरी कोसळत आहे. कुडाळमधील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आला आहे. आंबेरी पुलावर पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प असून 27 गावांचा तालूक्याशी संपर्क तुटला आहे. जनजीवन झाले विस्कळीत अनेक भागात विद्युतपुरवठा खंडीत झाला आहे. जिल्ह्यात सर्वञ काळोखी वातावरण आहे लोरे शिवगंगा नदीच्या पुलावर पाणी आलेले असून सदर ठिकाणी वाहतूक बंद केलेली आहे.
*वैतरणा नदीला पूर, मुख्य रस्ता पाण्याखाली*
पालघरमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वैतरणा पूर आला आहे. त्यामुळे काल संध्याकाळी सात वाजेपासून ते आतापर्यंत जवळपास अनेक तासापासून मनोर पालघर हा मुख्यरस्ता पाण्याखाली गेला. मुसळधार पावसामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
*कल्याण-मुरबाड रोडवरची वाहतूक ठप्प*
कल्याण मुरबाड रोडवरची वाहतूक ठप्प झाली आहे. म्हारळ, कांबा, वरप रायते ही गावे पाण्याखाली गेली आहेत. कांबा पेट्रोल पंपावर चार जण अडकले आहेत. एनडीआरएफची टीम इथे दाखल झाली आहे. कल्याण मुरबाड रोडवर पाणी साचल्याने म्हारळ, वरप, कांबा, रायते ही गावं पाण्याखाली गेली आहेत. कांबा रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर चार जण अडकलेत.
*कर्जत-बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर पाणी*
पुण्याकडे जाणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस रात्री बारा वाजल्यापासून बदलापूर रेल्वे स्थानकावर उभी आहे. कर्जत-बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान रुळावर अनेक ठिकाणी पाणी आल्याने या दोन्ही स्थानका दरम्यान रेल्वेसेवा स्थगित झाली होती. तसंच बदलापूर अंबरनाथ रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे सेवा बंद आहे. गोरेगाव काजगाव मधील हायवेवर पाणी पूर्ण रेल्वे पाण्याखाली रेल्वे रस्ता वाहतूक ठप्प आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस यांच ठिकाणी दोन वर्षांपूर्वी अडकली होती. त्याच्या कटू आठवणी जाग्या झाल्या आहेत.
*पुराचा धोका, कोल्हापुरात 250 नागरिकांचे स्थलांतर*
कोल्हापूर शहरातील अनेक उपनगरात पाणी शिरले आहे. रामानंद परिसरातील 200 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. महापालिकेच्या आपत्ती दलाकडून रेस्क्यू ऑपरेशनला सुरूवात करण्यात आली आहे. रामानंद परिसरातील 50 कुटुंबांचे स्थलांतर कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ही 34 फूट 6 इंच इतकी झाली आहे. हळू हळू पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू असल्यामुळे प्रशासन आत्ता अधिक सतर्क झालं आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी ही 43 फूट इतकी आहे.
*नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, धरणे भरली*
गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यातली धरणं आता भरू लागली आहे. त्यामुळे धरणांच्या जवळील निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी पावसात भिजत पर्यटक गर्दी करत आहेत.
*कर्जत घाटमाथ्यावर दरडी कोसळल्याने वाहतूक ठप्प*
लोणावळा, खंडाळा व कर्जत घाटमाथ्यावर कोसळत असलेल्या मुसळधार व अतिवृष्टीमुळे खंडाळा घाटात मुंबई पुणे लोहमार्गावर मंकीहिल ते पळसदरी दरम्यान अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने मुंबई पुणे. लोहमार्गावरील रेल्वे सेवा पूर्वपणे ठप्प झाली आहे.मुंबई पुणे रेल्वेसेवा ठप्प झाल्याने हजारो प्रवाशांनी बस व अन्य वाहनांनी आप आपल्या घरी व कामांच्या ठिकाणी जाण्याचा पर्यायी मार्ग स्विकारला आहे.