जामखेड न्युज——
कन्या विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक संतोष सरसमकर जिल्हा स्तरीय सर्वोत्कृष्ट व्हिडिओ स्पर्धेत प्रथम
सद्याच्या आंतरजालाच्या युगात ई- लर्निंग खूप महत्व असून शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी खुपच उपयोगी ठरत आहे. यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र राज्य, पुणे. द्वारा आयोजित सर्वोत्कृष्ट व्हिडिओ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतज्ञरयत शिक्षण संस्थेच्या जामखेड येथील कन्या विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक संतोष सरसमकर यांना जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचे रोख रक्कम रुपये 15000/- व तालुकास्तरावर इयत्ता नववी -दहावी मध्ये भाषा विषयात जामखेड तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल रोख रक्कम रुपये 3000/- रुपयाचे पारितोषिक मिळाले आहे. असे एकूण 18 हजार रुपयाचे रोख पारितोषिक त्यांना प्राप्त झाले आहे. यामुळे सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने ही स्पर्धा मागील शैक्षणिक वर्षात एप्रिल महिन्यात राबविली होती. ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा तीन गटांमध्ये घेण्यात आली होती. नुकतेच या स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत. यात संतोष सरसमकर यांनी जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यांमधून अनेक शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे विषय त्या- त्या इयत्तेप्रमाणे भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र असे होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा व्हिडिओमधून बहुरंगी व ज्ञानवर्धक माहिती मिळावी अशा हेतूने महाराष्ट्र शासनाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
संतोष सरसमकर हे जामखेड तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयात काम करतात. अनेक उपक्रम व अनेक प्रकल्प राबवून ते विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. या स्पर्धेमध्ये त्यांनी इयत्ता नववीच्या भाषा विषयातील “हास्यचित्रातली मुलं” या पाठावर आधारित व्हिडिओ बनवला होता.
या पाठात त्यांनी वर्गातील लाईव्ह स्केच तसेच संवाद आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून रंजक व आकर्षक व्हिडिओ बनविला होता.
समाज माध्यमांवर अनेक व्यंगचित्रे काढून नेहमीच प्रबोधन करणाऱ्या सरसमकर यांनी कोरोना काळातही लोकांचे मनोरंजन करून लोकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी निरंतर प्रयत्न केले होते. समाजातून, पालकातून आणि शिक्षक परिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे.