जामखेड न्युज——
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा
राशीन येथील भव्य स्टेडियमचे होणार भूमीपूजन
घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कर्जत-जामखेडच्या क्रीडाक्षेत्रात एक सोनेरी पर्व
आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदार संघातील राशीन येथे भव्य स्टेडियमचे उद्घाटन गुरुवार, दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कर्जत-जामखेडच्या क्रीडाक्षेत्रात एक सोनेरी पर्व सुरू होत आहे. विशेष म्हणजे या स्टेडियमचे भूमीपूजन भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यामुळे आता मतदारसंघातील युवा खेळाडूंसाठी मोठी संधी निर्माण होऊ शकते. यावेळी रोहित पवारांनी कर्जत व जामखेड मध्येही मोठे स्टेडियम उभारणार असल्याची घोषणा केली आहे.
घटस्थापनेच्या दिवशीच आणि आई जगदंबा मातेचे वास्तव्य असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघातील राशीनच्या पवित्र भूमीत भारताला विश्वचषक मिळवून देणारे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा येत आहेत.
त्यांच्या उपस्थितीत आपण क्रीडा संकुलाचे भूमिपूजन करणार आहोत, अशी पोस्ट रोहित पवार यांनी एक्स या समाज माध्यमावर शेअर केली आहे. आमदार रोहित पवार म्हणाले, मी स्वतः रोहित शर्माचा फॅन आहे. त्यांच्या अकॅडेमीच्या मदतीने ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळत आहे.
रोहित शर्मा यांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्यांची अकॅडेमी इथे सुरू करत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात रोहित शर्मा यांची ही पहिलीच अकॅडेमी आहे, जी रयत शिक्षण संस्थेच्या जागेत असणार आहे. तसेच कर्जत व जामखेड येथे देखील स्टेडियम होत आहे, येथे रणजी सामने होतील असा आमचा मानस असल्याचे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार म्हणाले, रयत शिक्षण संस्थेचे पण ग्राउंड उभे करण्यात येणार आहे, हे सर्व काम सीएसआर फंडातून होणार आहे. येथील अकॅडेमीमध्ये होतकरू खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
क्रिकेट, कुस्ती आणि उरलेल्या जागेत शाळा बांधली जाणार आहे. राशीन येथील क्रिकेट स्टेडियमला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे, तर कर्जत येथील स्टेडियमला येथील स्थानिकांना विचारून नाव ठरवण्यात येणार आहे. या स्टेडियमचा फायदा कर्जत मतदारसंघ व अहमदनगर जिल्ह्यातील मुलांना होईल, असा विश्वास रोहित शर्मा यांनी व्यक्त केला आहे.