जामखेड न्युज——
ज्ञानराधा मल्टीस्टेटवर ईडीची मोठी कारवाई
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात बीड छत्रपती संभाजीनगर, मुंबई पुण्यातील शाखांमधून ठेवीदारांचे कोट्यवधी बुडवल्याचे आरोप असणाऱ्या या पतसंस्थेवर ईडीने कारवाई केली असून या चारही शाखांमधील तब्बल 95 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. जास्तीच्या व्याजाचे अमिष दाखवत फसवणूक केल्याचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेटचे राज्यात व राज्याबाहेर जाळे पसरलेले आहे. गेल्या वर्षभरापासून मल्टीस्टेट बंद असल्याने गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत. या मल्टीस्टेट घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार सुरेश कुटे यांची मागील महिन्यात ईडी कडून कसून चौकशी करण्यात आल्यानंतर व केंद्र सरकारने दिलेल्या निर्णयानंतर बीड, छत्रपती संभाजी नगर पुणे व मुंबई या शाखांमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
ईडीकडून एकूण १०२ कोटींची मालमत्ता जप्त
ईडीकडून आत्तापर्यंत एकूण 102 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असून या चारही शाखांमधून जवळपास 95 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये या चारही शाखांमधील फ्लॅट, व्यावसायिक कार्यालय, प्लॉट अशी 85 कोटी 88 लाख रुपये किमतीची स्थावर मालमत्ता तसेच इतर मालमत्ता असे एकूण 95 कोटी एक लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संस्थापक सुरेश कुठे व इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रींगच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
ज्ञानराधा मल्टीस्टेटबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश
बीड जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांच्या ठेवी बुडवून हाँगकॉंगला पळवल्याचा ठपका असणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉ ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर केंद सरकारनं महत्वाच्या सूचना केल्या आहेत. गुंतवणूकदारांच्या अनेक तक्रारींची गंभीर दखल करत घेत या पतसंस्थेसाठी लिक्विडेटर नेमण्याचे निर्देश केंद्र सरकरने दिले आहेत. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात बैठक घेऊन हे निर्देश दिले आहेत. सोसायटी बंद करण्याची नोटीस सदर सोसायटीला 15 दिवसांच्या आत आक्षेप असल्यास सादर करण्यासाठी देण्यात येत येणार आहे.
या पतसंस्थेवर 42 हून अधिक गुन्हे
मराठवाड्यातील उद्योग क्षेत्रात बडे प्रस्थ असलेल्या सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट पथसंस्था नोव्हेंबर 2023 मध्ये अडचणीत आली. या पतसंस्थेवर प्राप्तिकर विभागाच्या छाप्यानंतर तीन लाख 70 हजार ठेवीदार, खातेदारांचे 3700 कोटी रुपये या पतसंस्थेत अडकले आहेत.
या प्रकरणात या पतसंस्थेवर 42 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या 50 शाखांचे मागच्या वर्षीचा ऑक्टोबर महिन्यापासून आर्थिक व्यवहार ठप्प असल्याचं सांगितलं जातंय. ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील इंदोर आणि अन्य ठिकाणी 50 शाखा असून साडेसहा लाख खातेदार आहेत.