जामखेड न्युज – – – –
कारागृह म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर अनेक चित्रपटातील दृश्य समोर येतात. अनेकदा आपण एखाद्याला काही चुकीची गोष्ट करण्यापासून विचलित करताना नेहमी म्हणत असतो की, तुला पिठलं खायला जायचं का? म्हणजेच सर्वसाधरण आपली धारणा आहे कारागृहात कैद्यांना चांगल्या प्रतीचं म्हणा किंवा वेगळं जेवण मिळत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का आता कैद्यांना आपल्यापेक्षाही भारी आणि झणझणीत मटणाचा स्वाद घेता येणार आहे. हो, महाराष्ट्रातील तुरुंगांमध्ये आता कैद्यांना चिकन, मटणपासून ते मिठाई, ड्रायफ्रूट्स आणि श्रीखंडापर्यंत अनेक प्रकारचे मिष्टान्न खायला मिळणार आहेत.
महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक (तुरुंग) सुनील रामानंद यांनी यासंदर्भात पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. तुरुंगातील कैद्यांसाठीच्या कँटिनमध्ये मिळणाऱ्या मूलभूत गरजेच्या वस्तूंसोबतच इतर अनेक वस्तूंची वाढ करण्यात आली आहे. अशा एकूण 30 गोष्टी या कँटीनमध्ये मिळणार असून त्याची यादीच महासंचालकांनी जाहीर केली आहे.
कारागृहात कैद्यांना मिळणार हे पदार्थ
फरसाण, मिठाई, बेकरीचे पदार्थ, ड्राय फ्रुट्स, सीझनल फ्रुट्स, दही, पनीर, लस्सी, सरबत, हवाबंद मांसाहारी पदार्थ, कचोरी, चिकन, मासे, शिरा, लाडू, चिवडा, शंकरपाळी, चकली, करंजी, श्रीखंड, आम्रखंड, शेव, पापडी, लोणचे, सामोसा, च्यवनप्राश, म्हैसूरपाक, जिलेबी, पेढे, चहा, कॉफी, फेस वॉश, टर्मरिक क्रीम, एनर्जी बार, ग्लुकॉन डी, अंघोळीचे साबण, अगरबत्ती, बूट पोलिश, ग्रीटिंग कार्ड, मिक्स व्हेज, अंडा करी, वडा पाव, कॉर्नफ्लेक्स, बोर्नव्हिटा, चॉकलेट, उकडलेली अंडी, पनीर मसाला, पुरणपोळी, आवळा, कॅण्डी, मुरांबा, गुलाबजामून, आंबा, पेरू, बदाम शेक, ताक, दूध, गूळ, गाईचे शुद्ध तूप, बटर, खिचडी, डिंक लाडू, बेसन लाडू, आले पाक, बटाटा भजी.
खाद्यपदार्थांसाठी पैसे मोजावे लागणार
या पदार्थांसाठी कैद्यांना पैसे मोजावे लागणार आहे. राज्याचे तुरुंग महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी तुरुंग प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. कारागृहात कैद्यांना आधीही यातील अनेक पदार्थ कॅन्टीनमध्ये विकत घेता येत होते. परंतु आता त्यात अजून काही पदार्थांचा समावेश करण्यात येणार आहेत. हे पदार्थ घेण्यासाठी कैद्यांना आपला खिशातील पैसा खर्च करावा लागेल.
खरेदीसाठी पैसे कुठून येणार?
कैद्यांना त्यांच्या कुटुंबियांकडून मिळणाऱ्या पैशांमधून दर महिन्याला साडेचार हजार रुपये कॅन्टिनमधील पदार्थ खरेदी करण्यासाठी वापरण्याची मुभा असते. त्याचा उपयोग करून कैदी आता या पदार्थांपैकी कोणताही पदार्थ खरेदी करू शकणार आहेत. याशिवाय तुरुंगात कैद्यांना शिक्षा भोगताना वेगवेगळ्या प्रकारची कामे करावी लागतात. ही कामे तुरुंग प्रशासन त्यांच्याकडून करून घेते. याबदल्यात या कैद्यांना वेतन किंवा परतावा म्हणून ठराविक रक्कम दिली जाते. तुरुंगाच्या कँटीनमध्ये मिळणाऱ्या पदार्थांची खरेदी करण्यासाठी कैदी ही रक्कम वापरू शकतात.
देशातील पहिले बहुमजली कारागृह
चांगल्या पदार्थांबरोबर अनेक महत्वाचे जेल रिफॉर्म्स करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सुनील रामानंद यांनी म्हटले आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील चेंबूरमध्ये देशातील पहिलं बहुमजली कारागृह बांधण्याचा प्रस्तावही तुरुंग प्रशासनाकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. चेंबूरमधील महिला आणि बालकल्याण विभागाची 15 एकर जागा त्यासाठी वापरण्यात येणार असून राज्य सरकारने त्याला मान्यता दिल्याचेही रामानंद यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर राज्यातील येरवडा, नाशिक, नागपूर, ठाणे या करागृहांचा विस्तार करण्याचा प्रयत्नही आपण करणार असल्याचं रामानंद यांनी म्हटले आहे.