जामखेड न्युज – – –
महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन सुरू झाले आहे. नवी मुंबईतील तुर्भे येथे मजेंटा (Magenta) कंपनीने इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन सुरू केले आहे. नवी मुंबईत सुरू झालेले हे देशातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंगळवारी झाले.
४५ मिनिटांमध्ये पूर्ण चार्जिंग –
मॅजेन्टा ग्रुपमार्फत भारतातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन तुर्भे येथे उभारण्यात आले आहे. या चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. या चार्जिंग स्टेशनमध्ये ४५ मिनिटांमध्ये वाहन पूर्ण चार्ज होईल, तसेच ज्या वाहनांना एसी स्लो चार्जिंग आवश्यक आहे, अशा वाहनांसाठी वेगळी मार्गिका येथे विकसित करण्यात आलीये. हे सर्व चार्जर्स ऑनलाईन रिमोटद्वारे नियंत्रित, चार्जग्रीन ॲपद्वारे अपडेट केले आहेत.
२४ तास राहणार सुरू –
तुर्भे येथील हे चार्जिंग स्टेशन २४ तास कार्यरत असेल. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी या स्टेशनवर २१ एसी/डीसी चार्जर उपलब्ध आहेत. या ठिकाणी एकूण २१ चार्जर असून यातील चार डीसी चार्जर १५ ते ५० किलोवॅट क्षमतेचे आहेत. तर १७ एसी चार्जर ३.५ ते ७.५ किलोवॅट क्षमतेचे आहेत.
“इंधनाचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. सर्वसामान्यांना ही दरवाढ परवडत नाही. याला पर्याय म्हणून विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण शासनाने ठरवले आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची गरज लागणार असून ही गरज मजेंटा कंपनी नक्कीच पूर्ण करेल”, असे सुभाष देसाई यावेळी म्हणाले.