रुग्णसंख्या वाढत असणाऱ्या गावात कडक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा – उपजिल्हाधिकारी संदीप निचित

0
178
जामखेड न्युज – – – 
जिल्ह्याच्या काही भागात कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसून येत असून अशा गावात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी कडक उपाययोजना कराव्यात. कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिल्या.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात आता जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. त्याचा आढावा निवासी उपजिल्हाधिकारी श्री. निचित यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. उपविभागीय अधिकारी (श्रीगोंदा -पारनेर) सुधाकर भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दहिफळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे आदी जिल्हा मुख्यालय येथून तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे तालुका स्तरावर उपस्थित होते.
यावेळी निचित म्हणाले, सध्या जिल्ह्याच्या काही भागात रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामागील कारणे शोधून संसर्ग साखळी तोडण्याचे आव्हान तालुकास्तरीय यंत्रणांसमोर आहे. त्यामुळे या यंत्रणांनी तात्काळ अशा गावांत जाऊन तेथील रुग्णवाढीची कारणे शोधून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. रुग्ण आढळून येणारा भाग प्रतिबंधित करण्यात यावा जेणेकरुन संसर्ग पसरणार नाही. कोरोना सुसंगत वर्तणुकीचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कडक कारवाई करावी.
ज्या गावात रुग्ण आढळून येत आहेत, तेथील पथके कार्यरत असणे आवश्यक आहे. तेथील तलाठी, ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील यांनी गावामध्ये गर्दी होणारे कार्यक्रम होणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, सार्वजनिक ठिकाणे, बाजार, दुकाने अशा ठिकाणी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन केले जात आहे, याची शहानिशा करणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणेने रुग्ण आढळून येणाऱ्या भागात अधिक गतीने तपासणी मोहिम राबवून संसर्ग पसरणार नाही, याची काळजी घ्यावी. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी ही सर्व यंत्रणांची जबाबदारी आहे. त्याचबरोबर नागरिकांनाही त्यासाठी उद्युक्त करणे यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती आणि प्रसंगी  कडक कार्यवाही अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आवश्यक ऑक्सीजनसाठी कार्यवाही करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी यापूर्वीच निर्देश दिले आहेत. सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी आवश्यक असणारा ऑक्सीजन साठवण्यासाठीची व्यवस्था, ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारणी, जम्बो सिलींडर, ड्युरा सिलींडरची व्यवस्था यासंदर्भात त्या-त्या तालुक्यातील हॉस्पिटल्स यांच्याकडून पूर्तता करुन घेणे आवश्यक आहे, असे निचित यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here