जामखेड न्युज——
कड्यात दुध भेसळीचे 19 लाखांचे साहित्य जप्त
जामखेड तालुक्यात कधी कारवाई होणार ?
सरकारचे तीस रुपये लिटरचा भाव हवेतच
आष्टी तालुक्यात कडा येथे दोन ठिकाणी आणि टाकळी अमीया एका ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अन्न औषध विभागाने कारवाई करत दुधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पावडर सह दूध भेसळीचे साधारण 19 लाखाचे साहित्य जप्त करण्यात आले. त्यामुळे आष्टीत दुध माफीयांचे धाबे दणाणले असून, मोठी खळबळ उडाली. पांढर्या दुधाच्या काळाबाजार करणार्या बोक्यांवर अमावस्याच्या दिवशीच संक्रात बसली आहे. जामखेड तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर दुध भेसळीचे रँकेट असल्याची चर्चा सर्व सामान्य नागरिकांमध्ये आहे. प्रत्यक्षात डेअरीवर कमी दुध असताना भेसळ पावडर वापरून डबल दुध तयार केले जाते. यामुळे नागरिकांमध्ये विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे.
तसेच दुधसंकलन केंद्रावर दुध देणाऱ्या शेतकऱ्यांना 30 रुपये प्रतीलिटर दर देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जे केंद्र शेतकऱ्यांना 30 रुपयांचा दर देणार नाहीत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश देत प्रत्येक दुध संकलन केंद्रावर संकलित होणाऱ्या दुधाची माहिती मिळावी यासाठी विशेष ॲप तयार करण्याच्या सुचनाही अहमदनगरचे पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिले होते.
पण अद्यापही अनेक ठिकाणी तीस रुपये भाव मिळत नाही.
आष्टी तालुक्यातील कडा येथे टाकळी फाटा रस्ता तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ अशा दोन ठिकाणी आणि टाकळी (अमिया) येथील एका दूध संकलन केंद्रावर रविवारी भल्या पहाटे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी बीड, धाराशिव व अहमदनगर येथील अन्न औषध प्रक्रिया विभागाच्या अधिकार्यासह टाकलेल्या छाप्यामध्ये विविध प्रकारच्या पावडरसह दूध भेसळीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे.
आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील अंबादास पांडुरंग चौधरी याचे कडा येथील टाकळी अमिया रोडलगत साईदत्त एंटरप्राययजेस नावाने दुकान व लगत पत्र्याच्या शेडमध्ये गोडाऊन आहे. गोपनिय माहितीच्या आधारे अन्न व पोलीस प्रशासनाने रविवारी पहाटे या ठिकाणी धाड टाकली. गोडाऊनची पाहणी केली असता भेसळयुक्त दुधाची निर्मिती करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईने आष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.
सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी संदिप देवरे, अनुराधा भोसले, सहाय्यक आयुक्त कांबळे, आष्टीचे प्रभारी पोनि विक्रांत हिंगे, सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस हवालदार बबुशा काळे, पोलीस नाईक प्रवीण क्षीरसागर, विकास जाधव, अंमलदार मजरूद्दीन सय्यद, सचिन गायकवाड, दिपक भोजे, सचिन पवळ, महिला अंमलदार जिजाबाई आरेकर, अर्चना आरडे, यांनी केली.
जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
या दुध भेसळी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन रविवारी सकाळी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
कारवाई होते, पुढे काय ?
अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी भेसळ होत असल्याच्या संशयावरून एखाद्या दुकानावर, दुध संकलन केंद्रावर छापा टाकतात. मात्र एक छापा टाकल्यावर त्या दुधाच्या तपासणीचे नमुने काही लवकर प्राप्त होत नाहीत, त्यामुळे कारवाईचे पुढे काय होते, हेच काही कळत नाही. एखादी कारवाई झाली की संबंधीत भेसळीवाले साहेब पुढे काय घोळ घालतात, त्यानंतर कारवाईला विश्रांती मिळते, त्यामुळे कारवाईचा नुसता फार्स नको तर प्रत्यक्षात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरीकांतून होत आहे.
दुधाची गुणवत्ता वाढविण्यासाठी पावडरचा वापर ?
मध्यंतरी दुधाचे दर पडल्यानंतर राज्य शासनाने दुधाला प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान देण्याचे जाहीर केले आहे परंतु हे अनुदान मिळवण्यासाठी 3.2 फॅट व ८.३ एसएनएफ असे गुणवत्तेचे प्रमाण ठेवले आहे. कमी प्रतीच्या दुधास शासन अनुदान देत नाही. त्यामुळे दुधाची गुणवत्ता वाढविण्यासाठी या दूध पावडरचा उपयोग केला जात असल्याची चर्चा आहे.