जामखेड न्युज——
बीड अहमदनगर महामार्गावरील सौताडा जवळील पुल गेला वाहून, वाहतूक साकत मार्गी
गेल्या दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर तसेच जामखेड पाटोदा, आष्टी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने बीड अहमदनगर राष्ट्रीय महामार्गांवरील सौताडा येथील तात्पुरता केलेला पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. यामुळे रात्री वाहनचालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या वतीने सौताडा जामखेड या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. सौताडा पंचशील नगर जवळील नदीवरील जुना पूल तोडून नवीन पूल बांधकाम सुरू आहे. या रस्त्यावरील वाहतूक तात्पुरत्या पुलावरून वळविण्यात आली होती.
मात्र काल सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने नदीला पूर आला. या पुराच्या जोरदार प्रवाहने हा पूल वाहून गेला. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक पूर्ण बंद झाली आहे.
या भागातील नागरिकांनी हा पूल पावसाळ्यापूर्वी करावा अशी मागणी नागरिकांनी केली होती, मात्र धिम्या गतीने होत असलेल्या या कामामुळे आता पूर्ण रस्ता बंद झाला आहे.
कडा येथील पुल तसेच सौताडा येथील पुल वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले तसेच शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे पीके पाण्याखाली गेले आहेत.
सौताडा पुल वाहून गेल्याने वाहतूक साकत मार्गी वळवण्यात आली आहे.