जामखेड न्युज——
जामखेड शहरातील रस्ते असून अडचण नसून खोळंबा, चिखलमय रस्ते, प्रशासनाचे दुर्लक्ष
जामखेड शहरातील सर्वात प्रतिष्ठित व नोकरी व व्यावसायिक लोकांची वस्ती म्हणजे, शिवाजी नगर, संभाजीनगर, शिक्षक काँलनी, विद्यानगर भागातील रस्ते म्हणजे असुन अडचण व नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली आहे. दलदल व चिखलमय रस्ते झाले आहेत. चिखलामुळे मोटार सायकल, चारचाकी गाडी बाहेर काढता येत नाही. नागरिकांना बाहेर पडताना चिखल तुडवत बाहेर पडावे लागत आहे. शहरात सगळीकडे चिखल, घाणीचे साम्राज्य, तुबंलेल्या मुताऱ्या, गटारांचे पाणी रस्त्यावर, रस्त्यावरील खड्डे यामुळे नागरिक त्रस्त आहेत. प्रशासनाचे मात्र पुर्णपणे दुर्लक्ष आहे.
शहरातील शिवाजीनगर, संभाजीनगर, शिक्षक काँलनी, विद्यानगर हा भाग नगरपरिषदेला सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा भाग आहे तरी या भागातील रस्त्याकडे प्रशासनाचे पुर्णपणे दुर्लक्ष आहे. येथील नागरिकांना पावसाळ्यात चिखल व उन्हाळ्यात फुपाटा याचा त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात संततधार
चालू आहे. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गासह बहुतांश लहान-मोठ्या रस्त्यांवरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. काही ठिकाणी खड्ड्यांत पाणी साचून तळी तयार झाल्याचे दिसत आहे. यातून वाट काढणे नागरिकांना कठीण होत आहे. पहिल्याच पावसात रस्त्यावर ठिक ठिकाणी खड्डेच खड्डे पडून रस्ते होत्याचे नव्हते झाले आहेत.
ही परिस्थिती पाहता नागरिकांच्या तोंडातून एकच वाक्य निघते काय रस्ते, काय खड्डे, काय तो चिखल काय ते जामखेड… सगळं कसं ओक्केच! शहरातील रस्त्यावर तर रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असा यक्ष प्रश्न उभा आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे.
पावसाच्या आगमनाने शहरातील या मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, वाहनचालक, पादचाऱ्यांसह विद्यार्थ्यांना या मार्गावरून वाट काढणे जिकिरीचे झाले आहे. रिपरिप पावसामुळे शहरातील खड्डेमय रस्त्यांचा त्रास वाढला आहे. त्याच बरोबर रस्ते, नालेसफाई व स्वच्छता कामासाठी नगर परिषद फंड, आमदार, खासदार यांचा निधी येत असतो. परंतु त्या निधीचा योग्य विनियोग केला जात नसल्याचे यावरून दिसत आहे.
शहरात गटारी, मुतारी, शौचालयांचीही दयनीय अवस्था झालेली आहे. गटारी तुडुंब भरल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.पावसाच्या पाण्याचा प्रवाह आणि विसर्ग होण्यासाठी पाहिजे तशा उपाययोजना होत नसल्याचेच यावरून सिद्ध होत आहे. या रस्त्यावर पाय ठेवणे जिकिरीचे झाले आहे. वाहनांचे लहान-सहान अपघात होतात, विद्यार्थी व लोकांच्या अंगावर चिखलाचे पाणी उडणे, असे प्रकार येथे नित्याचेच झाले आहेत.
जामखेड ते सौताडा महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. दिड वर्षापासून शहरातील रस्ताच अद्याप पूर्ण करता आलेला नाही. यामुळे चिखलाचे रस्ते यातच वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. लवकरात लवकर रस्ता पुर्ण करावा अशी नागरिकांची मागणी आहे. रस्त्याच्या कडेला असणारे गोरगरिबांचे अतिक्रमणे हटवली पण मोठ मोठ्या इमारती अद्याप तशाच आहेत. अनेक ठिकाणी विद्युत पोलही हटवलेले नाहीत. महामार्गाच्या गटाराच्या कडेला काही लोकांनी परत टपऱ्या उभ्या केल्या आहेत. नगरपरिषद त्यांच्या गटारासाठी, तसेच पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन साठी कधी जागा ताब्यात घेणार असा प्रश्न सर्व सामान्य नागरिक विचारत आहेत.