जामखेड न्युज——
एस. टी. महामंडळ म्हणजे असून अडचण नसून खोंळबा, आऊटडेटेड गाड्या, शिवशाहीलाही गळती

एसटी महामंडळाची सध्या राज्यात अत्यंत वाईट परिस्थिती आहे. अनेक बस आऊटडेटेड असून रस्त्यात कुठे बंद पडतील याचा अंदाज नाही. रस्त्यावर अनेक ठिकाणी बस बंद पडलेल्या दिसतात. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

जामखेड एसटी आगारात गेल्या ६ ते ७ वर्षांपासून एकही नवीन एसटी बस आली नसल्याने सर्व जुन्या बसेसचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खिळखिळ्या झालेल्या बसद्वारे वाहतूक सुरू आहे. आगारात ५६ एसटी बस कार्यरत असून, त्या जुन्या झाल्या आहेत. नवीन गाड्या मिळत नसल्याने नाइलाजास्तव जुन्याच बस चालू ठेवाव्या लागत आहेत. त्याचा त्रास चालक, वाहक आणि प्रवाशांना सोसावा लागत आहे.

याबाबत आमदार रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुरवठ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जत जामखेड साठी नव्या ३० एसटी बसला मंजुरी दिली होती. मात्र दीड वर्षाहोऊनही अद्याप पर्यंत एकही बस मिळाली नसल्याने जामखेडकरांचा संताप होत आहे. एककीकडे जामखेड बस स्थानक हायटेक होत असताना दुसरीकडे जामखेड आगारातील जवळपास सर्व एसटी बस १० लाख किलोमीटरच्या पुढे गेल्या असतानाही हि धोकेदायक वाहने रस्त्यावरून धावत असल्याने मोठ्या धोका निर्माण झाला आहे.

जामखेड आगाराच्या ताफ्यात ५६ बसेस आहे. यामध्ये शयनयन २ शिवशाही २ व सध्या बस ५२ आहेत यापैकी २ बस कर्जत साठी देण्यात आल्या आहेत यातील काही बसेस नादुरुस्त अवस्थेतच धावतात. लाईट बंद आहे, गरम होऊन बस बंद पडते, प्रेशर लिक आहे, स्प्रिंग तुटणे, टायर फुटणे, पंक्चर होणे, आसन व्यवस्था खराब होणे, पाटे तुटणे, आसन व्यवस्था निकामी होणे गिअर अचानक सटकतो, सीट तुटलेल्या यासह अनेक तक्रारी चालकांकडून होत असल्याची स्थिती आहे.त्यामुळे जामखेड आगाराच्या एसटीला मोठे अर्थिक नुकसान सोसावे लागते.

शिवाय दिवसेंदिवस खराब रस्त्यांवरील खड्ड्यांच्या संख्येत वाढ होतच असल्याने दिवसभरात चार ते पाच बसेसची दुरुस्ती करावी लागत आहे.एखाद्या बसचे ब्रेक निकामी झाले, अपघात झाला तर प्रशासनाला पर्यायी बस देण्यास खूपच तारेवरची कसरत करावी लागते. खराब बसमुळे चालकांनाही त्रास होत असून, काहींना कंबर, मानेचा विकार जडला आहे. जुन्या बसचे सस्पेंशन खराब झाल्याने प्रवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
चौकट
आमदार रोहित पवार यांनी केलेल्या पाठपुरवठ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जत जामखेड साठी नव्या ३० एसटी बसला मंजुरी दिली होती. मात्र दीड वर्ष होऊनही अद्याप पर्यंत एकही बस मिळाली नसल्याने जामखेडकरांचा संताप होत आहे. महायुतीचे सरकार आहे तर आमदार रोहित पवार महाविकास आघाडीकडे आहेत. यामुळे तर उशीर होत नाही ना ? अशी शंका उपस्थित केली जात आहे.





