मुंडे भगिनींना डावललं? : राजीनाम्याचं लोण नगरपर्यंत!!

0
306
जामखेड प्रतिनिधी 
                  जामखेड न्युज – – – ( सुदाम वराट) 
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न देण्यात आल्याने त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर आपण नाराज नसल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यांनी भूमिका मांडल्यानंतर काही तासांतच बीडमध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंडे भगिनींना डावललं जात असल्याचा आरोप करत राजीनामास्त्र उगारल आहे. शनिवारी अचानक भाजपाच्या बीड जिल्ह्यातील ११ तालुकाध्यक्षांसह २० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. बीड जिल्ह्यातील राजीनाम्याचं लोण अहमदनगर जिल्ह्यामध्येही पोहोचलं असून, पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती आणि जिल्हा उपाध्यक्ष यांनी राजीनामे देत नाराजी व्यक्त केली आहे. तर आज जामखेडमधील भाजपा पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. आज सकाळी अकरा वाजता राजीनामे देणार असल्याचे कळते
         केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला. या विस्तारापूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, डॉ. भागवत कराड यांचा समावेश करण्यात आला. कराड यांचा समावेश करून मुंडे भगिनींना शह देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची राज्याच्या राजकारणात सुरू आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जात होतं, पण मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. असं असलं तरी कार्यकर्त्यांची नाराजी मात्र लपून राहिली नाही.
शनिवारी (१० जुलै) बीड जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. बीड जिल्ह्याबरोबरच अहमदनगरमध्येही दोघांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. मुंडे भगिनींच्या समर्थक असलेल्या पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपाच्या सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनीसुद्धा आपल्या राजीनामा दिला आहे. या दोघांनीही भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे राजीनामे सोपवले आहेत.
बीडमधील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची संख्या २५ वर
बीड जिल्हा परिषद सदस्या सविता बडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर आणि भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संग्राम बांगर, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप, समाज माध्यमप्रमुख अमोल वडतीले, तालुकाध्यक्ष महादेव खेडकर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांच्यासह २५ पदाधिकार्‍यांनी शनिवारी पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपवले. यामध्ये परळीसह एकूण ११ तालुकाध्यक्षांचा समावेश आहे.
     चौकट
आज जामखेड तालुक्यातील मुंडे समर्थक सकाळी अकरा वाजता केशर हाॅल येथे एकत्र येत असून आपापल्या पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांच्याकडे सोपवणार असल्याची माहिती भाजपा कार्यकर्ते बाजीराव गोपाळघरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here