जामखेड न्युज——
नाशिक शिक्षक मतदारसंघात चुरस वाढली
नगर विरूद्ध नाशिक सामना रंगणार
शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू, टीडीएफ मधेही फूट
नाशिक शिक्षक मतदारसंघात सध्या कमालीची चुरस वाढली आहे. महाविकास आघाडीने विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या ऐवजी ॲड. संदीप गुळवे यांची शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपाकडून विवेक कोल्हे व डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी आपले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. टीडीएफने भाऊसाहेब कचरे यांना उमेदवारी जाहीर केली होती. आता टीडीएफ संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य निशांत रंधे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या सर्वात मोठ्या संघटनेत रंधे यांच्यामुळे फूट पडल्याचे दिसून येत आहे.
नगर नाशिक लढत होणार
नगर जिल्ह्यातून डॉ राजेंद्र विखे, विवेक कोल्हे, भाऊसाहेब कचरे तर नाशिक जिल्ह्यातून ॲड. संदीप गुळवे, निशांत रंधे तसेच किशोर दराडे हे उमेदवार असतील यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघात नगर विरूद्ध नाशिक लढत अपेक्षित आहे.
महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित मात्र ही जागा भाजप कि शिवसेना यात रस्सीखेच सुरू आहे. भाजपाकडून इच्छूक डॉ राजेंद्र विखे, विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आजच्या लोकसभा निकालानंतर किशोर दराडे कोणाची उमेदवारी घ्यायची हा निर्णय घेणार आहेत. टीडीएफ मध्ये ही फूट पडली आहे.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करीत सोमवारी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. महायुतीत ही जागा शिवसेनेकडे (शिंदे गट) आहे. डॉ. विखे हे महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विद्यमान सेना पुरस्कृत आमदार किशोर दराडे हे पक्षीय उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याने भाजपने ही जागा शिवसेनेकडून हिसकावून घेण्याची तयारी केल्याचे दिसत आहे. सेना पुरस्कृत आमदार दराडे यांनी शिवसेनेत प्रवेश करणे टाळले आहे.
पक्षीय कामात व लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही ते सक्रिय न राहिल्याने शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसचे पदाधिकारी ॲड. संदीप गुळवे यांना पक्षात प्रवेश देत या मतदारसंघात त्यांची उमेदवारी निश्चित केली. सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना एबी अर्ज दिला. महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला असला तरी महायुतीत या जागेवरून शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
लोकसभा निकालाचा कल पाहून याबाबत निर्णय होईल, असे सांगितले जाते. शिंदे गटाने आमदार दराडे यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न केले होते. मात्र त्यास यश आले नाही. दराडे हे देखील लोकसभेचा अंदाज घेऊन निर्णय घेणार आहेत. मागील निवडणुकीत ते अपक्ष म्हणून मैदानात होते. आपण कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नसल्याचे ते आजही स्पष्ट करतात.
त्यामुळे ते शिंदे गटात जातील की नाही, याबाबत साशंकता आहे. या एकंदर परिस्थितीत भाजपने ही जागा ताब्यात घेण्याचे नियोजन केल्याचे दिसत आहे. सोमवारी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या सर्व नेत्यांना आपण भेटलो. महायुतीचा उमेदवार म्हणून आपणास उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली असल्याचे डॉ. राजेंद्र विखे यांनी सांगितले.