जामखेड न्युज——
पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा, गुन्हेगार सैराट,
अधिकाऱ्यांवर हल्ले, वेश्या व्यवसाय, पाकिटमारी आणि बरेच काही—-
पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या काळात गुन्हेगारांवर असणारा वचक ते बदली होऊन गेल्यावर आलेले पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या काळात ढिला झाला आहे. गुन्हेगार राजरोसपणे उथळ माथ्याने धाक दडपशाही करत फिरत आहेत. यात अधिकारीही सुटलेले नाहीत. मागील महिन्यात महसूल अधिकाऱ्यांनी वाळूची गाडी अडवली असता गुन्हेगारांनी अधिकाऱ्यांना मारहाण केली तरीही ही घटनेत पोलीस स्टेशनने गुप्तता राखली व महसूल विभागानेही वाच्यता करू नये असे पोलिसांकडून सांगण्यात आले. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली असताना अधिकारी पण सुटलेले नाहीत. पोलीसांचा वचक कमी झालेला आहे असे दिसते.
एके काळी सिंघम पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या काळात पोलीसांचा गुन्हेगारांवर वचक होता. गुन्ह्याची संख्या कमी झाली होती. गुन्हेगारांना वेळच्या वेळी योग्य शिक्षा होत होती. यामुळे गुन्हेगार शांत होते. पण संभाजीराव गायकवाड यांची बदली झाली आणि पोलीस निरीक्षक महेश पाटील आले. मुंबईत काम केलेले अधिकारी पण डोक्यात मुंबईचीच हवा आहे. जामखेड मध्ये ते रूळताना दिसत नाहीत. आणि गुन्हेगारांवर वचक नाही त्यामुळे मारामारी घटना वाढल्या आहेत. याचा त्रास सर्व सामान्य नागरिकांना होत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात गुन्ह्याची संख्या वाढली आहे.
बस स्थानक परिसरात राजरोस वेश्या व्यवसाय
मराठवाड्याचे प्रवेशद्वार व तीन जिल्ह्याचे सीमेवर असलेले जामखेड बस स्थानकात चोवीस तास मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा गजबजलेल्या बसस्थानक परिसरात राजरोस पणे दिवसरात्र वेश्या व्यवसाय सुरू असतो पण जामखेड पोलीसांना हे का दिसत नाही. खाजगीत ते म्हणतात आम्ही हप्ते देतो आम्हाला काय भिती आहे.
बसस्थानक परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले
पाकिटमारी, गळ्यातील चैन, मंगळसूत्र हिसकावणे या घटनेत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बुधवारी दि २२ मे रोजी एका महिलेच्या पर्स मधील ६२५०० रूपये किंमतीचे सोन्याचे गळ्यातील गंठण
चोरी गेले होते. तो गुन्हा जामखेड पोलीस स्टेशनला २८ मे रोजी दाखल झाला आहे. अशा अनेक घटना वारंवार घडत आहेत. चोरी करणारे राजरोसपणे बसस्थानक परिसरात फिरत असतात. पोलीसांना मात्र हे दिसत नाहीत.
रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाहने व विक्रेते
सध्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. यातच रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाहने तसेच विक्रेते बसतात यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. पोलीसांचे मात्र वाहने व विक्रेते यांना अभय आहे.
वेगवेगळे माफिया व गुन्हेगारांचे अधिकाऱ्यावरही हल्ले
वेगवेगळे माफिया तसेच गुन्हेगार सध्या उथळ माथ्याने फिरताना दिसतात मागील महिन्यात तर जामखेड मधील महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांला मारहाण झाली तरी पोलीसांनी ही घटना जाणून बुजून गुप्त ठेवली जर अधिकाऱ्यावर हल्ले होत असतील तर सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
सिंघम पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या काळात गुन्हेगारांवर असणारा वचक ते बदली होऊन गेल्यावर आलेले पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या काळात ढिला झाला आहे. अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.