जामखेड न्युज——
निलेश लंके यांच्या बँनरवर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो, भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारसभेचं एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं. या पोस्टरवर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि माजी आमदार स्वर्गीय राजीव राजळे याचा फोटो छापण्यात आला आहे. यावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आचारसंहितेचा भंग केला जात असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात भाजपचे पदाधिकारी विष्णुपंत अकोलकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली लेखी तक्रार दिली आहे. यामुळे अहमदनगरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळत आहे.
भाजपने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार निलेश लंके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.निलेश लंके यांच्या प्रचाराच्या पोस्टरवर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय राजीव राजळे फोटो असलेलं बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झालं.
देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीची
रणधुमाळी सुरु आहे. राज्यामध्ये देखील राजकारण रंगलेले आहे. यंदाच्या निवडणूकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरु आहे. त्याचबरोबर सर्व प्रयत्नांनी निवडणूक जिंकण्याची तयारी सुरु आहे. अहमदनगरच्या रिंगणामध्ये निलेश लंके यांनी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर डमी उमेदवार निलेश लंके यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यामुळे अहमदनगरच्या निवडणूकीमध्ये वेगळीच रंगत आली आहे. आणि आता बँनरवर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व राजीव राजळे यांचा फोटो छापण्यात आला आहे. यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.