प्रभाग तीन मधील पराभूत उमेदवाराने केला विजयी उमेदवारांचा सत्कार, लोकशाहीतील खिलाडूवृत्तीचे उत्तम उदाहरण

0
1757

जामखेड न्युज——

प्रभाग तीन मधील पराभूत उमेदवाराने केला विजयी उमेदवारांचा सत्कार, लोकशाहीतील खिलाडूवृत्तीचे उत्तम उदाहरण

 

जामखेड नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक तीन मधून पराभूत झालेले उमेदवार सुरज निमोणकर यांनी प्रतिस्पर्धी विजयी उमेदवार पोपट (नाना) राळेभात व मनोज कुलकर्णी यांचा सत्कार करून लोकशाहीतील खिलाडूवृत्तीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

जामखेड नगरपरिषदेची मतमोजणी रविवारी २१ डिसेंबर रोजी झाली. प्रभाग तीन मधील पराभूत उमेदवार सुरज निमोणकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, निवडणूक प्रक्रियेनंतर मतभेद विसरून लोकहित व विकासाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.

निवडणूक ही लोकशाहीचा अविभाज्य भाग असून विजय-पराजय स्वाभाविक आहे. मात्र निवडणूक संपल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन प्रभागाच्या आणि शहराच्या विकासासाठी काम करणे गरजेचे आहे, असे मत सुरज निमोणकर यांनी मांडले.

निवडणूक निकालानंतर सुरज निमोणकर यांनी विजयी उमेदवार पोपट (नाना) राळेभात व मनोज कुलकर्णी या दोन्ही नगरसेवकांना घरी बोलावून सत्कार केला. यावेळी विजयी उमेदवारांनीही या सत्काराबद्दल आभार व्यक्त करत आपली निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात झाली.

यापुढील काळात नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या घटनेमुळे जामखेड शहरात सुसंस्कृत राजकारणाचा सकारात्मक संदेश पोहोचला असून लोकशाही मूल्यांची जपणूक करणारी ही कृती सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.

यावेळी योगेश हुलगुंडे, आविष्कार आव्हाड, प्रसाद होशिंग, सौरभ पवार व गौरव समुद्र उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here