जामखेड न्युज——
मोबाईल रेंज नसल्याच्या निषेधार्थ बीएसएनएलच्या टॉवर चढून सरपंचाच्या पतीचे शोले स्टाईल आंदोलन
जामखेड तालुक्यातील देवदैठण परिसरात मोबाईल ला रेंज नसल्याच्या निषेधार्थ बीएसएनएल टॉवरवर चढून सरपंच पती यांनी शोले स्टाईल आंदोलन केले याची संपूर्ण तालुक्यात एकच चर्चा आहे. गावात कसलीही रेंज नाही फक्त बीएसएनएल टाॅवर आहे. पण बीएसएनएल म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था आहे. सतत रेंज गायब असते. याचा निषेध म्हणून अनोखे आंदोलन केले.
याबाबत माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील देवदैठणच्या सरपंच हर्षदा महानवर यांचे पती संतोष महारनवर यांनी देवदैठण येथे बीएसएनएलच्या टॉवरचे तीन दिवसांपासून मोबाईल रेंज नसल्याच्या कारणाने वैतागून टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले, त्यामुळे परिसरात हा एक चर्चेचा विषय झाला होता. ग्रामस्थांनी विनंती केल्यानंतर ते खाली उतरल्यामुळे ग्रामस्थांचा जीव भांड्यात पडला होता.
देवदैठण हे गाव डोंगरदर्याच्या खोऱ्यात वसलेले गाव आहे. या गावात फक्त बीएसएनएल कंपनीचे टॉवर असून इतर कोणत्याही खाजगी कंपनीचा टॉवर या परिसरात उपलब्ध नाही फक्त बीएसएनएल कंपनीच्या टॉवरवर सर्व मोबाईल धारकांना विसंबून राहावे लागत आहे.
त्यातच कंपनीची तुटपुंजी सेवा मिळत आहे, हे टॉवर सतत बंद असल्यामुळे या ठिकाणी रेंज येत नाही त्यामुळे बाहेरील जगाचा सर्व संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांना व परिसरातील गावांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बीएसएनएलचे टॉवर असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था देवदैठण करांची झाली आहे.
दिवसेंदिवस सरकारी कंपनी असलेली बीएसएनएलची मोबाईल सेवा सर्वच ठिकाणी विस्कळीत होत असल्याने ग्राहकांचा ओढा हा जिओ, एअरटेल, आयडिया, व्होडाफोन इत्यादी खाजगी कंपनी कडे वाढत आहे.
त्या कंपनी सेवा चांगल्या प्रकारे देत असल्याने आपोआपच ग्राहकही या कंपनीचे सिम कार्ड खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथून पुढील काळात देवदैठण येथील बीएसएनएलची सेवा चांगल्या पद्धतीने ग्राहकांना द्यावी अन्यथा नागरिक पुढील काळात उग्र आंदोलन हाती घेतील असे देवदैठणचे पोलीस पाटील प्रशांत भोरे यांनी सांगितले.