जामखेड आगाराचे नियोजन कोलमडले, विद्यार्थ्यांना करावा लागतोय उन्हात पायी प्रवास

0
456

जामखेड न्युज——

जामखेड आगाराचे नियोजन कोलमडले, विद्यार्थ्यांना करावा लागतोय उन्हात पायी प्रवास

 

मार्च महिना सुरू झाला कि, बारावी व दहावी परीक्षा तसेच उन्हाच्या कडाक्यामुळे सकाळी शाळा असते तसे एसटी महामंडळाला वेळापत्रक व पत्र दिलेले असते पण आगाराचे नियोजन पुर्णपणे कोलमडलेले दिसते. वेळेवर बस न येणे, मध्येच बंद पडणे, नादुरुस्त बस यामुळे विद्यार्थ्यांना भर उन्हात पायी प्रवास करण्याची वेळ येत आहे.

बस आगारात फोन केला तर लँड लाईन फोन उचलत नाहीत, बाजूला काढून ठेवतात तसेच उडवाउडवीची उत्तरे देतात यामुळे कधी कधी दोन दोन तास बसची वाट पाहत विद्यार्थ्यांना बसावे लागले आणि कधी तर बसच येत नाही यामुळे पायीच जावे लागते भर उन्हात विद्यार्थ्यांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे.

जामखेड बस आगारात एकुण 56 बस आहेत सर्व बस जुन्या आहेत. अनेकांना काचा नाहीत पत्रे हलतात तसेच गाडी सुरू झाली की प्रचंड धूर सोडतात घाटात बस खूपच कमी वेग असतो तसेच अनेक ठिकाणी बस बंद पडतात. दररोज साधारण साडेतीन हजार लीटर डिझेल लागते.

एकीकडे राज्य परिवहन विभाग आर्थिक समस्यांचा सामना करत आहे,त्यातच जामखेड आगार सध्या विविध समस्यांनी ग्रासले असून अनेक एसटी बस रस्त्यावरच बंद पडत असून यामुळे प्रवाशांचे हाल होतात अनेक एसटी गाड्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. या अशा डबघाईला आलेल्या गाड्यांमुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या तर नोकरदारांना कामाच्या वेळा पाळणे मुश्किल बनले आहे. तसेच चालक व वाहक अशा सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. एसटीच्या बहुसंख्य गाड्या जुन्या झाल्याने त्यांची खूप कामे निघत आहेत. कुठलेही प्रवासी वाहन किती वर्षे वापरावे याला मर्यादा आहेत. या संबंधातील काही लिखित व अलिखित नियम आहेत. पण त्याचा विचार होत नाहीत.

ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतुकीचा भार आजही राज्य परिवहन विभागावरच असून खेडोपाडी एसटीचे जाळे पसरले आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेउन सर्वसामान्यांच्या सेवेत असलेले एसटी महामंडळ नेमके कोणासाठी आहे, असा प्रश्न पडण्याची वेळ आली आहे. पूर्वीची एशियाड, त्यानंतर निमआराम आणि आता हिरकणी अशी वेगवेगळी नावे देऊन प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडा आता भंगार झाल्या आहेत. जामखेड बस आगारातून मुंबई पुणे कोल्हापूर,नाशिकसह अन्य जिल्हाच्या ठिकाणी एसटी सेवा पुरवली जाते. तर विविध शाळा व महाविद्यालयांच्या वेळापत्रकांनुसार सवलतीच्या दरात फेर्‍यांचे नियोजन केले आहे. दरम्यान काही वर्षांपासून या आगाराच्या एसटी गाड्या प्रवासात नादुरुस्त होत असून सध्या हे प्रमाण अधिकच वाढले आहे. धुळीने माखलेला बसचा आंतर-बाह्यभाग, मोडकी आसने, फुटलेल्या खिडक्या, बस स्थानक आणि आगारात अस्वछता असे चित्र गेली अनेक वर्षे एसटी स्थानकांत दिसत आहे अवैध प्रवासी वाहतूक, वाढता इंधनाचा खर्च आणि आधुनिक सुविधांच्या स्पर्धेचा सामना यामुळे एसटी आर्थिक कचाट्यात सापडली आहे, तर दुसरीकडे ६० टक्के गाड्या निर्धारित वेळेत सुटणे, मनुष्यबळाचा अभाव, गाड्या अचानक रद्द होण्याच्या प्रमाणाचा फटकाही एसटीला बसत आहे. महामंडळाच्या उपाययोजनांचे नियोजनाचा अभाव असल्यामुळे एसटीची गती मंदावत आहे.सर्व बसची सध्याची स्थिती दयनीय झाल्याचे चित्र आहे. यामुळे अपघाताचाही धोका संभवतो. बसस्थानकात उपलब्ध असणाऱ्या अनेक बस ‘आरटीओ’च्या नियमानुसार अनफिट आहेत. यामुळे प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करीत आहे.


पत्रे हलतात, खिडक्या नाहीत
बसेस खराब असल्यामुळे प्रवासीही घाबरतात यामुळे चालक व प्रवासी सतत खटके उडत आहेत अनेक वर्षापासून आगाराला एकही बस मिळालेली नाही. जुन्या बसच वापरात आहेत त्यामुळे कुठे बंद पडेल याचा नेम नाही. तक्रार कुठे करायची वाहक चालक म्हणतात आगार प्रमुख आमचे ऐकत नाहीत आगार प्रमुख म्हणतात वरिष्ठ कसलीही दखल घेत नाहीत.

…तर प्रवासी पुन्हा एसटीकडे वळतील :
एसटीवेळेवर सुटत नसल्याने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. गाड्या वेळेत धावल्या, तर प्रवासी पुन्हा एसटीकडे वळतील. एसटीने चांगल्या दर्जाची सेवा द्यावी. तसेच, खराब गाड्यांमुळे प्रवासी एसटीकडे पाठ फिरवत असल्याची स्थिती आहे.

श्री साकेश्वर विद्यालयाने बस बाबत वारंवार पत्रव्यवहार केला तोंडी सांगितले शेवटी नगर आँफीसलाही पत्र दिले आहे पण बस मात्र अनेक वेळा येत नाही कधी कधी खुपच उशिरा येते यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

बस स्थानकावर चौकशी साठी लँड लाईन फोन फक्त शो साठी आहे. अनेक वेळा बाजूला काढून ठेवलेला असतो तर बऱ्याच वेळा उचलला जात नाही. बस ची चौकशी केली तर डिझेल नाही म्हणतात. आगार प्रमुख म्हणतात डिझेल आहे. यामुळे समन्वयाचा अभाव दिसतो यात मात्र विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here