जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट) –
महाराष्ट्राला संत परंपरेचा मोठा वारसा लाभलेला आहे. वारकरी संप्रदायाने आपल्या आध्यात्मिक परंपरेतून समानतेचा, एकात्मतेचा जो संदेश सर्व जगाला दिला आहे, तो सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणजे ‘भजन’. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात युवा पिढीला अध्यात्माची आवड जोपासता यावी, भजन गायकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं यासाठी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय ऑनलाईन ‘सृजन भजन स्पर्धा-२०२१’, या भजन स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचं आयोजन करण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पंढरपूरला आषाढी एकादशीला पायी वारी नेण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र या संकटकाळात सर्वांना विठू माऊलींच्या सहवासाची भक्तिमय अनुभूती मिळावी यासाठी दि. १० जुलै ते १५ ऑगस्ट २०२१ या दरम्यान राज्यस्तरीय ऑनलाईन ‘सृजन भजन स्पर्धा-२०२१’ आयोजित केली आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने वारकऱ्यांच्या भजनाच्या समृद्ध परंपरेला भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम आमदार रोहित पवार यांच्याद्वारे केले जात आहे. ‘सृजन’च्या माध्यमातून यंदा प्रथमच ही भजन स्पर्धा राज्यस्तरीय पातळीवर आयोजित करण्यात येत असून महाराष्ट्रातील सर्व इच्छुक नागरिकांना, भजन गायक भजनी मंडळांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे. कोरोना संकटकाळात भव्यदिव्य स्वरूपातील स्पर्धेचे आयोजन करता येत नसल्याने राज्यातील नाशिक, पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद, अमरावती आणि कोकण या सातही विभागांमध्ये ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत व जामखेड तालुक्यातील भजन मंडळांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध असणार आहे.
सृजन आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन ‘सृजन भजन स्पर्धा-२०२१’ मध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवेशशुल्क आकारले जाणार नाही. या स्पर्धेसाठी राज्यभरातील सर्व स्पर्धकांनी दि. १० जुलैपर्यंत आपली नाव नोंदणी करावयाची आहे व निर्धारित तारखेच्या आत स्पर्धेसाठी आपले अभंग रेकॉर्डिंग करून त्याचे ऑडीओ किंवा व्हिडीओ क्लिप पुढील विभागवार संपर्क क्रमांकांवर पाठवायचे आहेत.
*नाशिक विभाग* (नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदूरबार,जळगाव) – 87678 05228*
*पुणे विभाग* (पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर) – 87678 05229
*नागपूर विभाग* (नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा, गडचिरोली) – 87678 05230
*मुंबई विभाग* (मुंबई, नवी मुंबई, ठाणे) – 87678 05231
*औरंगाबाद विभाग* (औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली) – 87678 05232
*अमरावती विभाग* (अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ) – 87678 05234
*कोकण विभाग* (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) – 87678 05235
सदरहू स्पर्धा तीन फेऱ्यांमध्ये होईल यामध्ये पहिल्या दोन फेरी या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील. स्पर्धेची अंतिम फेरी दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी शारदानगर, बारामती येथे होईल. या स्पर्धेच्या संपूर्ण माहितीसाठी व आपली नावनोंदणी करण्यासाठी *9696 330 330* या क्रमांकावर संपर्क करावा. स्पर्धेतील नियम व अटींमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार संयोजकांकडे राहतील.