जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
जामखेड तालुक्यात बळीराजा पावसाची प्रतिक्षा करीत आभाळाकडे डोळे लावून वाट पाहू लागला आहे. खरीप हंगामासाठी जूनच्या पहिल्या व दुसर्या आठवड्यात पावसाची आशा पल्लवित झाली व पाऊस थोड्या प्रमाणात झाला. यानुसार बळीराजाने घाटमाथ्यावर सोयाबीन, तर इतर ठिकाणी उडिद पिकांची पेरणी केली. बियाणे व खते मिळवण्यासाठी खुपच पळापळ झाली अनेकदा दुकानांसमोर अनेक वेळ रांगेत थांबुनही खते व बियाणे मिळाले नाहीत. सर्व अडथळ्यांची शर्यत पार करत बळीराजाने काळ्या आईची ओटी भरली रिमझिम पाऊस येत असल्याने पिकेही बाळसे धरू लागली होती पण गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे व कडाक्याचे ऊन पडत आहेत. पिके माना टाकू लागली आहेत. सुकून चालली आहेत.
सोयाबीन व उडीद बियाणाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा होता बी-बियाणांसाठी बळीराजाने दुकानासमोर रांगेत उभे राहून, बियाणांसाठी दुकानदारांची विनवणी करत असलेला बळीराजा मात्र आता निसर्गाच्या अवकृपेमुळे पावसाची वाट पाहात बसला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन, उडीद,
मुग याची खुरपणी व कोळपणी झालेली आहे. आता प्रतिक्षा पावसाची आहे. घाटमाथ्यावर वन्य प्राण्यांचा मोठा उपद्रव सुरू आहे. रानडुक्करे व हरणांचे कळप पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत आहेत. पिके कोवळी असल्याने वन्य प्राणी पिके फस्त करत आहेत. यामुळे बियाणे खते मिळवताना रांगा, वन्य प्राण्यांचा उपद्रव आणी आता पावसाची ओढ यामुळे बळीराजा हैराण झाला आहे. डोळे आभाळाकडे लावून बसला आहे.
काही भागात पाऊस जास्त तर काही भागात कमी पाऊस झाला आहे. उन्हाची तीव्रता वाढली असून उष्ण व कोरडे हवामान पावसाचा थेंबही पडत नसल्यामुळे बळीराजावर संकट आले आहे. बाजारपेठेवर देखील आर्थिक उलाढाली वरील परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटानंतर नैसर्गिक संकट बळीराजाला जाणवू लागले आहे. खरीप हंगाम वाया तर जाणार नाही ना? अशी चिंता शेतकरी व्यक्त करू लागला आहे. आता तालुक्यासह जिल्यातील शेतकरी पावसाची प्रतिक्षा करत आकाशाकडे डोळेलाऊन बसले आहेत.