जामखेड न्युज——
जामखेडमध्ये पाच कॉपी बहाद्दरावर बारावीच्या इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला कारवाई
जामखेड तालुक्यातील परीक्षा केंद्राबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या कडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या होत्या यानुसार आज अहमदनगर माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी जामखेड तालुक्यातील नान्नज परीक्षा केंद्रावर भेट देत परीक्षेत गैरकृत्य करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
नान्नज परीक्षा केंद्रावर पाच विद्यार्थ्यांवर शिक्षणाधिकारी अशोक कडुस यांनी कारवाई केली यात हळगाव येथील दोन विद्यार्थी, मोहा येथील दोन तर नान्नज येथील एक विद्यार्थी अशा पाच विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यातील सर्व परीक्षार्थीं व पालक यांच्या मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षा काल सुरु झाली. बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरला राज्यात तब्बल 58 कॉपी (copy cases) बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. सर्वाधिक कॉपी बहाद्दर छत्रपती संभाजी नगर येथे पकडले असून मुंबई, कोल्हापूर, अमरावती आणि कोकण विभागात परीक्षेदरम्यान एकही गैरप्रकार आढळून आला नाही.
राज्य मंडळाच्या अंतर्गत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या विभागीय मंडळाच्या माध्यमातून इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार होऊ नये यासाठी राज्य मंडळातर्फे अभियान राबविण्यात आले. मात्र तरीही पहिल्याच पेपरला 58 विद्यार्थी परीक्षेदरम्यान गैरप्रकार करताना आढळून आले.
राज्य मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात 26, पुणे विभागीय मंडळात 15 ,लातूर विभागीय मंडळात 14 ,नाशिक विभागीय मंडळात २ तर लातूर विभागीय मंडळात १ विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आले . या विद्यार्थ्यांवर नियमानुसार कार्यवाही केली जाणार आहे
नगर जिल्ह्यात एकूण 64 हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. ११० केंद्रावर परीक्षा परीक्षा सुरू आहे. जिल्हा स्तरावर सात भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. यातील संवेदनशील केंद्रावर व्हिडिओ चित्रीकरण उपद्रवी केंद्रावर तहसीलदार, गटविकास अधिकारी भेटी देणार आहेत.
विद्यार्थी अर्धा तास अगोदर केंद्रांवर हजर
परीक्षार्थी पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास हजर होते. वर्गात जाण्यापूर्वीच शिक्षकांनी त्यांची अंगझडती घेऊन आत सोडले. पेपरला उशिराने आल्याने कोणत्याही विद्यार्थ्याला परत जावे लागले नाही. माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी व्यवस्थित नियोजन केल्याने पहिल्या पेपरला सर्वच केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली.
भरारी अन् बैठे पथकांची धास्ती
महसूल व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी एकूण ४६ भरारी पथके तयार केली आहेत. प्रत्येक भरारी पथकाने मंगळवारी (ता. २१) त्यांच्या त्यांच्या तालुक्यातील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. कोणत्याही परीक्षा केंद्रावर त्यांना अनुचित प्रकार आढळला नाही.
गटशिक्षणाधिकारी यांनीही दिल्या अनेक केंद्रावर भेटी
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी तालुक्यातील अनेक केंद्रावर भेट देत आवश्यक त्या सूचना दिल्या एकंदर परीक्षा सुरळीत पार पडली पण पहिल्याच दिवशी पाच विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.