जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
मतदारसंघातील अनेक प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्यासाठी आमदार रोहित पवारांनी आत्तापर्यंत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसमावेत वेळोवेळी बैठका घेऊन अनेक मोठे प्रश्न मार्गी लागले आहेत तर अनेक प्रश्न प्रगतीपथावर आहेत.याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली (दि.१ रोजी)नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली.
सर्वच विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आ. पवारांनी अनेक प्रश्न हाती घेतले. यामध्ये जिल्ह्यातील महत्वाचे असणारे राष्ट्रीय महामार्ग क्रं.५१६-अ अहमदनगर-करमाळा, राष्ट्रीय महामार्ग क्रं.५४८-ड श्रीगोंदा जामखेड, राष्ट्रीय महामार्ग क्रं.७५२-ई पैठण-पंढरपूर आदींचा समावेश आहे.कोणताही मार्ग केवळ मंजूर करून चालत नाही.भूसंपादनासह इतर विभागाच्या मंजुऱ्याही त्यासाठी आवश्यक असतात.शासकीय हालचाली,पाठपुरावा आदींवर वेळोवेळी लक्ष केंद्रित करावे लागते.आता या कष्टाचे फळ म्हणून लवकरच महामार्गाच्या निविदाही निघणार आहेत.तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि सध्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वीही झालेल्या बैठकीत अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.राष्ट्रीय महामार्गाबाबतच्या अडचणी सोडवण्याकरिता जिल्हाधिकारी व त्यासंबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचीही आ.रोहित पवार यांनी दोन वेळा भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून यातील श्रीगोंदा-जामखेड व अहमदनगर-करमाळा या रस्त्यांना मंजूरी मिळाली असून त्याबाबत निविदाही झालेल्या आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असणार्या कुकडी कालव्याच्या भूसंपादनाचा विषयही पाठपुराव्याने मार्गी लागला आहे त्यामुळे अनेक वर्षानंतर शेतकर्यांना योग्य मोबदला मिळाल्याने त्यांच्यासाठी हा सुखद धक्काच आहे.या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक तर केलीच परंतु राज्यशासनाकडून मतदारसंघात विविध कामांसाठी मंजूर करून आणलेल्या निधीच्या विनियोगाकरता लागणाऱ्या प्रशासकीय मंजुऱ्या,सार्वजनिक प्रकल्पांच्या जमीनविषयक बाबी,नव्याने भूमिपूजन झालेल्या पोलिस वसाहती, प्रशासकीय इमारती,केंद्रीय राखीव पोलिस बल व जिल्हा नियोजन समितीच्या वतीने विविध कामांसाठी मंजूर झालेल्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होत असल्याने नागरिकांना त्याचा फायदा होत आहे.सातत्याचा पाठपुरावा आणि चिकाटी यामुळे कर्जत जामखेड शहरातील विकासाच्या दृष्टीने विकास आराखडेही आता लवकरच मंजूर होऊन दोन्ही शहरे उत्कृष्ठरित्या विकसित होणार आहेत.शहरांपुरता विकासाचा दृष्टिकोन मर्यादित न ठेवता मतदारसंघातील मोठ्या गावांचे अनागरी विकास आराखडेही प्रस्तावित असून ही गावेदेखील साचेबद्धरित्या विकसित होतील आणि व्यवसाय व व्यापाराला चालना मिळून बाजारपेठाही विकसित होतील.वीजकपात असणार्या प्रमुख गावांमध्ये मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहेत. दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे व वाड्या-वस्त्यांना जोडणारे पाणंदरस्ते, शेतरस्ते, गावरस्ते, प्रमुख जिल्हा मार्ग,राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्ग यांच्या नव्याने मंजुर्या, जुन्या रस्त्यांचे मजबुतीकरण,डांबरीकरण,जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांना मंजुर्या,कर्मचारी निवासस्थाने,प्रशासकीय इमारती,पुनर्वसित गावांचे प्रश्न, वन विभागाशी संबंधित प्रकल्प यासह अनेक कामांचा आढावा या बैठकींमध्ये घेण्यात आला.
अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा समन्वय व सुसंवाद कर्जत जामखेडसाठी उभारी घेणारा ठरणार आहे. कारण आ. पवार यांच्या बैठकीसाठी अधिकाऱ्यांची असलेली हजेरी उत्तम समन्वयाचा नमुनाच आहे.आणि त्यांनी सर्व कामे पुर्ण करण्याची ग्वाही दिली.
या आढावा बैठकीस जिल्हाधिकाऱ्यांसह,मुख्य कार्यकारी अधिकारी, उपवनसंरक्षक,सा.बां.विभागाचे अधिकारी,सहा.संचालक नगर रचना,नगररचनाकर,निवासी उपजिल्हाधिकारी,उपजिल्हाधीकारी (भूसंपादन) समन्वय अधिकारी,प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग, अधीक्षक भूमी अभिलेख, कूकडी पाटबंधारे विभागाचे अधिकारी,दूरसंचार विभाग, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी आदी प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते.