जामखेड न्युज——
शालेय जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे
शालेय विद्यार्थ्याचे आरोग्य निरोगी व तंदुरुस्त राहण्यासाठी तसेच उत्साही व आनंदी राहण्यासाठी शालेय जीवनात खेळाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्याचे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी श्री. बाळासाहेब धनवे यांनी केले .
जामखेड महाविद्यालयात निवारा बालगृहाच्या वतीने तालूकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, निवारा बालगृहाचे प्रमुख श्री. अरूण जाधव यांनी अतिशय कठिण परिस्थितीतून मात करून कष्टाने स्वतः ओळख निर्माण केली आहे.
समाजात मानाचे स्थान मिळवून एक आदर्श निर्माण केला आहे. निवारा बालगृहाच्या माध्यमातून अनाथ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ते मोलाचे काम करीत आहेत. त्यामुळे ते खरोखरच अनाथांचे नाथ असल्याचे धनवे म्हणाले.
यावेळी अरूण जाधव यांनी गोरगरीब विद्यार्थी यांना शिक्षणासाठी जी मदत लागेल ती निवारा बालगृहातर्फे केली जाईल तसेच येथून पुढे होणाऱ्या क्रिडा स्पर्धाचे यजमान पदही आपण निवारा बालगृहा मार्फत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य एम्. एल. डोंगरे, ल.ना होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, बापू ओहोळ, शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी खेळाडू मोठ्या संख्यने उपस्थित होते .