जामखेड न्युज——
मोबाईल वर बोलण्याच्या रागातून जामखेड तालुक्यात एकाचा खुन, तिघांविरोधात गुन्हा दाखल
मोबाईलवर इतर व्यक्तीला मोठ्याने शिवीगाळ करत असल्याच्या कारणावरून तीन जणांनी एकास गजाने व लाकडी बांबूने मारहाण करून खुन केला. ही घटना काल सायंकाळी बोर्ले ते जवळा रस्त्यावरील पठाडे वस्ती जवळ घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी सुरेश बाबुराव पठाडे, आदित्य (उर्फ) गोपाल सुरेश पठाडे व एक आनोळखी सर्व रा. जवळा फटा, पठाडे वस्ती, जवळा. ता. जामखेड आशा तीन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील बोर्ले येथिल मयत शिवाजी रामदास चव्हाण हा आपल्या नातेवाईका समवेत दि १३ डिसेंबर २०२३ रोजी बोर्ले ते जवळा रोडवरील एका हॉटेलमध्ये गेला होता. यावेळी सायंकाळी ७:४५ वा मयत शिवाजी चव्हाण हॉटेलच्या बाहेर कोणाशीतरी फोनवर मोठ्याने बोलत शिवीगाळ करत होता. त्या ठिकाणी दुसरा व्यक्ती म्हणजे आरोपी सुरेश बाबुराव पठाडे हा आला व शिविगाळ का करतो या कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची होऊन जोराचे भांडण लागले.
या भांडणाची माहिती मयताचे वडील रामदास चव्हाण यांना समजताच ते आपल्या पत्नीसह तातडीने त्या ठिकाणी मोटारसायकलवर पोहचले. यावेळी सुरेश पठाडे हा त्याच्या हातातील गजाने व आदित्य (उर्फ) गोपाल सुरेश पठाडे व एक अनोळखी इसम आसे तीघे जण शिवाजी यास मारहाण करत होते. यावेळी त्या ठिकाणी असलेले शिवाजीचे नातेवाईक लक्ष्मण सुखदेव मते रा.
मतेवाडी, फिर्यादीचा पुतण्या निलेश अभिमान चव्हाण तसेच मयताचे आई वडील हे देखील भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आरोपी हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते यावेळी आरोपी सुरेश पठाडे सह इतर आरोपींनी शिवाजीला गजाने व लाकडाने मारहाण केली व शिवीगाळ करून घटनास्थळाहुन निघुन गेले.
या मारहाणीत शिवाजी रामदास चव्हाण वय ३२ वर्षे रा. बोर्ले. ता. जामखेड हा गंभीर जखमी झाला होता. शिवाजीच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव होत होता. यानंतर घटनेची माहिती समजताच फिर्यादी यांच्या भावाची मुले दिलीप चव्हाण व अंकुश चव्हाण हे घटनास्थळी आले त्यांनी तातडीने खाजगी वाहनाने जखमी शिवाजी यास जामखेड येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल केले. मात्र दि १४ डिसेंबर २०२३ रोजी पहाटे ४ वाजता शिवाजी चव्हाण याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत शिवाजी चव्हाण यांच्यावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मोबाईल फोनवरून इतर व्यक्तीला शिवाजी ने फोनवर शिवीगाळ केली म्हणून दुसर्याच व्यक्तीच्या मारहाणीत शिवाजीला नाहक आपले प्राण गमवावे लागले. मोबाईलवर फोनच्या बोलण्यावरून हा खुन झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच कर्जत उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत वाखारे, जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तातडीने जामखेड पोलीस स्टेशन चे पो.हे.कॉ संजय लोखंडे, पो.ना.अजय साठे, पो.ना अविनाश ढेरे, नवनाथ शेकडे, प्रविण पालवे, प्रकाश जाधव, यांनी तपास करीत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत.