जामखेड न्युज——
फ्यूचर काँम काँप्युटर इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून वाकी व पाडळी ग्रामसभेत ‘सारथी’ ची जनजागृती

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी, पुणे या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील मराठा ,कुणबी मराठा, व मराठा कुणबी या लक्षित गटाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले जात आहे. या योजनेची माहिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून फ्यूचर काँम काँप्युटर इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून वाकी येथे आरती मते व पाडळी येथे ज्ञानेश्वर पवार यांनी ग्रामसभेत सारथी विषयी माहिती दिली.

संघ लोकसेवा आयोग ( UPSC )च्या परीक्षेत या सारथी संस्थेच्या माध्यमातून निशुल्क प्रशिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. सारथी संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोग तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आकस्मिक खर्च व मासिक विद्यावेतन देण्यात येते याविषयी माहिती देण्यात आली. सारथी संस्थेद्वारे यूजीसी नेट ,एम. एच. सेट, एम. फिल ,पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभिछात्रवृत्तिचा लाभ दिला जातो. तसेच सारथी कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम तसेच दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी योजनेच्या माध्यमातून इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते, याबरोबरच डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना याविषयी देखील माहिती देण्यात आली.

एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक गणेश आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली फ्यूचर काँम काँप्युटर इन्स्टिट्यूट चे संचालक प्रा.महादेव डुचे व मेघा डुचे हे जामखेड मध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून विद्यार्थ्यांना एमएससीआयटी कोर्सच्या माध्यमातून संगणकाचे ज्ञान देत आहेत. त्यांच्याच माध्यमातून वाकी व पाडळी ग्रामसभेत यांनी माहिती दिली
यावेळी वाकीचे सरपंच गणेश वायकर, ग्रामसेवक व ग्रामस्थ तसेच पाडळीचे सरपंच बाळासाहेब खैरे, ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.









