आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नामुळे ITI मधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींच्या विद्यावेतनात भरीव वाढ

0
130

जामखेड न्युज——

आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नामुळे ITI मधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींच्या विद्यावेतनात भरीव वाढ

 

नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या आणखी एका मुद्द्यावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झालं. आ. तांबे यांनी आयटीआय संस्थांमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींच्या विद्यावेतनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी पावसाळी अधिवेशनात केली होती. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनापोटी ४० ऐवजी ५०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) मधील विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये विद्यावेतन देण्यात येईल, अशी घोषणा मे २०२३ मध्ये कौशल्य रोजगार, उद्योजगता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली होती. मात्र त्यानंतर याबाबतचा निर्णय झाला नव्हता. ITI मधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनापोटी फक्त ४० रुपये एवढीच रक्कम मिळत होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत होती.

आमदार सत्यजीत तांबे यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा करत माहिती घेतली. तसंच पावसाळी अधिवेशनात त्यांनी या प्रशिक्षणार्थींच्या विद्यावेतनात वाढ करण्याच्या घोषणेचं पुढे काय झालं, असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या घोषणेला शासन निर्णयाचं स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं म्हटलं होतं. मंत्रीमहोदयांच्या या आश्वासनानंतरही आ. तांबे यांनी याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे विद्यावेतन ५०० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

 

  चौकट

प्रशिक्षणार्थींना दिलासा मिळेल

आयटीआयमध्ये शिकणाऱ्या या प्रशिक्षणार्थींपैकी अनेकांची आर्थिक स्थिती बिकट असते. त्यामुळे त्यांना सरकारकडून मिळणाऱ्या या विद्यावेतनाचा मोठा आधार असतो. या विद्यार्थ्यांपैकी काहींशी चर्चा केल्यानंतर मी हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात मांडला होता. मंत्रिमहोदयांनी या प्रश्नाची दखल घेत मला आश्वासनही दिलं होतं. आता मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचा आनंद आहे. या निर्णयामुळे या प्रशिक्षणार्थींना नक्कीच दिलासा मिळेल, हे समाधान आहे. – आ. सत्यजीत तांबे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here