उद्योगमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही एमआयडीसीबाबत बैठक नाही;कर्जत-जामखेडकर नागरिक व युवा आक्रमक मतदारसंघातील विविध ठिकाणी उद्या होणार रास्ता रोको

0
138

जामखेड न्युज——

उद्योगमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही एमआयडीसीबाबत बैठक नाही;कर्जत-जामखेडकर नागरिक व युवा आक्रमक

मतदारसंघातील विविध ठिकाणी उद्या होणार रास्ता रोको

 

कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाटेगाव-खंडाळा येथील सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या आणि केवळ सरकारच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या एमआयडीसी बाबतचा मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे. आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी उद्योग मंत्र्यांच्या भेटी घेऊन हा विषय मार्गी लावण्याबाबत विनंती केली व अंतिम मंजुरी मिळावी यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला. विधिमंडळ अधिवेशनात वेळोवेळी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतरही सरकारकडून केवळ मंजुरीच्या आश्वासन मिळत असल्याने व कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने अखेर आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरात भर पावसात आंदोलन केले.

दरम्यान, आंदोलनाला बसलेल्या आमदार रोहित पवार यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट घेऊन तात्काळ स्वरूपात उद्याच्या उद्या बैठक लावून याबाबत चर्चा केली जाईल असे आश्वासन दिले व आपल्या आंदोलन मागे घेण्याची विनंती आमदार रोहित पवार यांना केली. आमदार रोहित पवार यांनीही मंत्री महोदयांच्या विनंतीला मान देऊन तात्काळ आंदोलन स्थगित केले. विधिमंडळ परिसरातील सर्व पत्रकारांच्या समोर मंत्रिमहोदयांनी बैठकीबाबत आश्वासन दिले. परंतु दुसऱ्या दिवशी आमदार रोहित पवार यांच्यासह अधिकारी या बैठकीच्या प्रतीक्षेत तब्बल साडेचार तास मंत्री महोदयांची वाट पाहत होते परंतु उद्योग मंत्री उदय सामंत हे बैठकीला उपस्थित राहिले नाही. यावरून सरकार पुन्हा एकदा कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीच्या निर्णयाबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

या सर्व घडामोडींवरून कर्जत-जामखेड मतदारसंघातील युवा नागरिक व समस्त जनता आक्रमक झाली असून आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील विविध ठिकाणी गुरुवार दिनांक 27 जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलन करण्यात येणाऱ्या ठिकाणांचा तपशील व वेळ खालील प्रमाणे –
करमाळा चौक राशीन – सकाळी ९ वाजता
माही जळगाव चौक – सकाळी ८:३० वाजता
क्रांती चौक मिरजगाव – ८:३० वाजता
खर्डा चौक जामखेड – सकाळी ११ वाजता
छत्रपती चौक कर्जत – सकाळी १० वाजता

वरील नमूद ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक, युवा वर्ग हे रास्ता रोको आंदोलन करणार असून सरकारने कर्जत जामखेड एमआयडीसी बाबत तात्काळ निर्णय घ्यावा व केवळ आश्वासनाचा पाऊस पाडू नये हीच प्रमुख मागणी त्यांची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here