जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – ( सुदाम वराट )
कोरोना संकटकाळात कर्जत जामखेडमधील एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकाची ढाल झालेल्या आ. रोहित पवार यांच्या ‘फिरता दवाखाना’ या उपक्रमाला तालुक्यातील गावोगावच्या नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत असून गेल्या चार महिन्यात ११ हजारहून अधिक लाभार्थ्यांना मोफत घरपोच प्राथमिक उपचार व औषधे देण्यात आली आहेत. या अभिनव उपक्रमाचे कर्जत व जामखेडमधील वयोवृध्द, गर्भवती महिला व विकलांग नागरिकांकडून कौतुक होत आहे. आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून राबवण्यात येणारा हा उपक्रम कर्जत व जामखेडवासीयांसाठी कोरोनाच्या या काळात एक वरदानच ठरत आहे.
तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाला आरोग्य सुविधेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी कार्यरत राहून विविध प्रभावी उपाययोजना आ. रोहित पवार कर्जत व जामखेड तालुक्यात राबवत आहेत. दरम्यान या काळात घरी असणा-या आपल्या लोकांविषयीही आ. रोहित पवारांना तितकीच आर्त काळजी असल्याचे राबवण्यात येणा-या विविध उपक्रमांतून पाहायला मिळत आहे. कोरोना काळातील निर्बंधांमुळे काही ज्येष्ठ नागरिक, विकलांग व्यक्ती, गर्भवती महिला यांच्यासह इतर नागरिकांना घराबाहेर पडण्यास विविधप्रकारे अडथळा येतो. तेव्हा याचे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या कर्जत जामखेडमधील नागरिकांना औषधोपचारांसाठी त्रास सहन करावा लागू नये, याकरिता आ. रोहित पवारांनी ‘फिरता दवाखाना’ हा उपक्रम चार महिन्यांपूर्वी सुरु केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एचडीएफसी बँकेच्या सहकार्यातून आ.रोहित पवार आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व बारामती ॲग्रोच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेला हा उपक्रम कर्जत-जामखेडवासीयांसाठी उपयुक्त ठरत आहे. कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यातील गावागावांमध्ये जाऊन मोबाईल क्लिनीक व्हॅन नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करते. ‘मोबाईल क्लिनिक’ व्हॅनसोबत ‘तज्ज्ञ’ डॉक्टरांची टीम तैनात असून नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर प्राथिमक उपचार करून त्यांना औषधे देण्यात येतात. केवळ इतकेच नव्हे तर व्हॅनमध्ये असणा-या वैद्यकीय यंत्रणेद्वारे रक्तदाब, मधुमेह तपासणी देखील करण्यात येत आहे.
आजवर चार महिन्यात कर्जत व जामखेडमधील ११ हजारहून अधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतलेला आहे. गावागावांतील वयोवृध्द नागरिक, विकलांग व्यक्ती तसेच गर्भवती महिलांना या कोरोनाच्या काळात मोफत घरपोच औषधोपचार मिळत असल्याने या नागरिकांनी समाधान व्यक्त करीत आ. रोहित पवार यांचे आभार मानले आहेत. ही मोबाईल क्लिनिक व्हॅन व अन्य यंत्रणा तालुका आरोग्य विभागासाठी उपयुक्त ठरत असून कर्जत व जामखेडमधील गावांना आरोग्यसुविधेबाबत मोठा दिलासा मिळाला आहे.
*प्रतिक्रिया-*
कोरोनाच्या निर्बंधांमुळे अनेक नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. या जाणिवेतून वयोवृध्द नागरिक, विकलांग व्यक्ती, गर्भवती महिलांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून घरपोच मोफत तपासणी होऊन त्यांना औषधोपचार मिळावेत यासाठी हा उपक्रम सुरु केलेला आहे. तसेच बहुतांश नागरिकांमध्ये रक्तदाब, मधुमेहाची समस्या असल्याचे या तपासणी उपक्रमात आढळून आले. आजवर माझ्या ११ हजारहून अधिक कर्जत जामखेडवासीयांना याचा लाभ मिळाला असून फिरता दवाखान्याची ही सुविधा यापुढेही लोकसेवेसाठी गावोगावी अशीच कार्यरत राहणार आहे. या उपक्रमासाठी परिचारिका व आशाताई यांची मोलाची साथ मिळाली, याबद्दल त्यांचे आभार.
आमदार रोहित पवार