जामखेड न्युज——
जामखेडमध्ये राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन
१५ जुलै पर्यंत हजारो युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देणार – ज्योती बेल्हेकर
राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन जामखेड महाविद्यालयात आज करण्यात आले. राज्यात महिला व मुलींच्या होणाऱ्या निघृण हत्या व हिंसाचार, तसेच बदलत्या काळानुसार महिलांच्या बदललेल्या समस्या व त्यावर कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यासाठी माननीय मंत्री महिला व बालविकास विभाग मंगल प्रभात लोढा यांचे संकल्पनेतून तालुकास्तरावर युवतीसाठी प्रशिक्षण आयोजित केले जात आहे.
शाळकरी व महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांची जीवनशैली तंत्रज्ञानाने खूपच बदलली आहे व त्यातून सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. त्यासंबंधी युवतींना मार्गदर्शन व स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक देण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमासाठी सायली सोळंके उपविभागीय अधिकारी जामखेड, प्रकाश पोळ गटविकास अधिकारी, पंचायत समिती जामखेड महेश पाटील पोलीस निरीक्षक जामखेड, बाळासाहेब धनव गटशिक्षणाधिकारी जामखेड, श्रीम. ज्योती बेल्हेकर बालविकास प्रकल्प अधिकारी जामखेड, प्रणाली कुलकर्णी, भारतीय स्त्री शक्ती संस्था प्रतिनिधी सुषमा पोकळे विधी सल्लागार जामखेड, डॉ. एम एल.डोंगरे प्राचार्य जामखेड महाविद्यालय,
बाळासाहेब पारखे पर्यवेक्षक ल.ना. होशिंग विद्यालय जामखेड, कु. दीक्षा पंडित ऑल महाराष्ट्र थांग ता असोसिएशन, मा.जगदीश शिरसाठ संरक्षण अधिकारी जामखेड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रशिक्षणासाठी 250 पेक्षा जास्त युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख वक्त्या मा. प्रणाली कुलकर्णी मॅडम यांनी महिला व मुलीवर हिंसाचार संकल्पना व सद्यस्थिती या विषयावर मार्गदर्शन केले. अँड.सुषमा पोकळे मॅडम यांनी सायबर क्राईम या विषयावर युवतींना मार्गदर्शन केले .उपविभागीय अधिकारी सोळंके मॅडम यांनी उपस्थित युवतींना फेसबुक ,व्हाट्सअप, इंस्टाग्राम या सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करणे बाबत व सजग राहणेबाबत मार्गदर्शन केले.
महेश पाटील पोलीस निरीक्षक जामखेड यांनी युवतींना सद्यस्थितीत तंत्रज्ञान – महिला व मुलींना असलेले धोके या विषयावर मार्गदर्शन केले.
तसेच प्रश्नोत्तराच्या माध्यमातून युवतींशी संवाद साधला.जामखेड महाविद्यालयाचे प्राचार्य डोंगरे यांनीही प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी राजमाता जिजाऊ व अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनाची उदाहरणे देऊन युवतींनी संकटाचा सामना कसा केला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. तालुक्यातील समर्थपणे काम करणाऱ्या महिला अधिकारी यांचा आदर्श समोर ठेवून युवतींनी उच्च ध्येय बाळगून त्यासाठी प्रयत्न करावेत असा संदेश त्यांनी प्रशिक्षणार्थी युवतींना दिला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीम. ज्योती बेल्हेकर, सूत्रसंचालन प्रा. तुकाराम घोगरदरे तर आभार प्रदर्शन प्रा. अविनाश फलके यांनी मानले. प्रशिक्षण तीन दिवसीय असून दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी मुलींना प्रत्यक्ष स्वसंरक्षणाचे धडे ऑल महाराष्ट्र थांगता असोसिएशन कडून दिले जाणार आहेत.15 जुलैपर्यंत तालुक्यातील 1000 युवतींना स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीम.ज्योती बेल्हेकर यांनी दिली.