आरोग्याची वारी पंढरीच्या दारी उपक्रमात 12 लाख वारकऱ्यांची झाली आरोग्य तपासणी

0
222

जामखेड न्युज——

आरोग्याची वारी पंढरीच्या दारी उपक्रमात
12 लाख वारकऱ्यांची झाली आरोग्य तपासणी

 

आषाढीच्या (Ashadi Wari) इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या शिंदे फडणवीस सरकारने पालखी सोहळे निघाल्यापासून वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणीसाठी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी ही योजना राबवली. देहू, आळंदी ते पंढरपूर व आषाढी यात्रेमध्ये उभारलेले आरोग्याचे महाशिबीर यामध्ये एकूण विक्रमी 11, 64,684 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली या महत्वाकांक्षी योजनेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यावर सोपवल्याने यासाठी सर्वतोपरी तयारी राज्य शासनाकडून करण्यात आली होती. आज याचा अहवाल आरोग्य विभागाने मुख्यमंत्र्यांना सादर केला असून एवढ्या मोठ्या संख्येने शासकीय पातळीवर आरोग्य तपासणीची ही पहिलीच वेळ असणार आहे.


पहिले महाआरोग्य शिबिर

संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याने प्रस्थान ठेवल्यापासून या तपासण्यांना सुरुवात झाली होती. या पालखी सोहळ्याच्या वाटेवर 6,61,343 वारकऱ्यांची बाह्य रुग्ण तपासणी झाली तर 3264 रुग्णांवर उपचार करण्यात आले. संपूर्ण पालखी मार्गावर एकूण 6,64, 607 वारकऱ्यांना शासनाच्या या मोफत तपासणीचा फायदा मिळाला. पालखी सोहळे वाखरी येथे अखेरच्या मुक्कामासाठी आल्यावर पहिले महाआरोग्य शिबीर हे 27 आणि 28 हे दोन दिवस 24 तास सुरु ठेवण्यात आले होते. यानंतर पालखी सोहळे पंढरपुरात पोचताच दर्शन रांग असलेल्या गोपाळपूर येथे दुसरे आणि साडे तीन लाख भाविकांचा मुक्काम असणाऱ्या भक्ती सागर जवळ तिसरे महाआरोग्य शिबीर हे 28, 29 आणि 30 जून असे तीन दिवस चालवण्यात आले होते. यासाठी डॉक्टर , नर्सेस आणि मदतनीस असा 6218 कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली होती .

जवळपास 32 प्रकारच्या तपासण्या झाल्या

 

आरोग्य शिबीर आणि 17 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यात मिळून 5 लाख 77 हजार वारकऱ्यांची मोफत तपासणी झाली. तर 154 अति सिरिअस वारकऱ्यावर वेळीच उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचू शकले. याशिवाय या तीन शिबिरात 4217 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत .यामध्ये जवळपास 32 प्रकारच्या तपासण्या या मोफत झाल्या असून 4500 रुग्णांचे डोळे तपासून त्यांना चष्म्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे .

वारकरी संप्रदायाने दिला मोठा प्रतिसाद

 

आषाढी ही वारकरी संप्रदायातील सर्वात मोठी यात्रा असून यामध्ये वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीचा शिंदे फडणवीस सरकारच्या उपक्रमाला वारकरी संप्रदायाने मोठा प्रतिसाद दिला होता. शिवाय आता कार्तिकीमध्येही आमच्या मोफत तपासण्या आणि उपचार करण्याची मागणी देखील भाविकांनी केली होती. मुख्यमंत्री यांच्या या उपक्रमामुळे एक प्रकारचा विक्रम झाला असून यामुळे भाविकांना देव दर्शनासोबत मोफत तपासणीचा देखील फायदा घेता आला आहे .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here