संविधान समता वारकरी दिंडी म्हणजे समतेचा विचार पेरणारी चळवळ – ॲड. डॉ. अरुण जाधव

0
192

जामखेड न्युज——

संविधान समता वारकरी दिंडी म्हणजे समतेचा विचार पेरणारी चळवळ – ॲड. डॉ. अरुण जाधव

संविधान समता वारकरी दिंडी म्हणजे समतेचा विचार पेरणारी, माणसे जोडणारी आणि संविधानातील मूल्यांचा प्रचार, प्रसार करून जनजागृती व प्रबोधन करणारी चळवळ आहे. असे प्रतिपादन ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केले.

ग्रामीण विकास केंद्र, संविधान साथी टीम व माय लेकरू प्रकल्प कर्जत-जामखेडच्या वतीने आयोजित खर्डा ते धनेगाव पायी संविधान समता दिंडीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. धाकटी पंढरी समजल्या जाणाऱ्या धनेगाव येथील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात आयोजित या दिंडीच्या सांगता सोहळ्यास कोरो मुंबईचे महिंद्र रोकडे, कुणाल राम टेके, सचिन खाडे, उषा देशमुख, राजू शिंदे, संदीप कांबळे, हनीफभाई, जिजाबाई खाडे, खर्ड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जानकर, सुजाता लवांडे, ग्रामीण विकास केंद्राच्या सचिव उमाताई जाधव, संचालक बापू ओहोळ, प्रकल्प समन्वयक सचिन भिंगारदिवे, प्रसिद्धीप्रमुख भगवान राऊत आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, साधू संतांची शिकवण, थोर महापुरुषांचे विचार आणि संविधानातील समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता ही मूल्ये आणि भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले मूलभूत हक्क व अधिकार याबाबत समाजाला सतत जागृत ठेवणे हा या दिंडीचा प्रमुख उद्देश आहे.

कोरो मुंबईचे महेंद्र रोकडे म्हणाले की, थोर संत तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथेतून व अभंगातून माणुसकीचे विचार दिले. त्याचा अर्थ म्हणजे भारतीय संविधान होय. मात्र अलीकडच्या काळात संतांची वचने आणि संविधानाच्या विरोधात काही मंडळी काम करीत आहेत. अशा प्रवृत्तींना खड्यासारखे बाजूला सारले पाहिजे. विठ्ठल हा सर्व जाती-धर्मातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. मात्र कालच्या पंढरपूरच्या वारीतून भटक्यांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न काही मंडळींनी जाणीवपूर्वक केला. त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत त्यांनी त्यांचा निषेध नोंदवला. पांडुरंग हा माणुसकीचा देव आहे आणि त्याचे दर्शन घेण्यापासून भटक्यांना कोणीही रोखू शकत नाही. असे त्यांनी ठणकावून सांगितले.

ग्रामीण विकास केंद्राचे संचालक बापू ओहोळ यांनी प्रास्ताविक केले. संतोष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. उमाताई जाधव यांनी आभार मानले. सकाळी १० वा. खर्डा येथील सिताराम गड येथे नारळ वाढवून या दिंडीचे प्रस्थान झाले . खर्डा, वंजारवाडी, सातेफळ, तरडगाव, सोनेगाव व धनेगाव मार्गे ही दिंडी सायंकाळी ४ वा. विठ्ठल मंदिरात पोहोचली.दिंडी मार्गावर दादा पाटील दाताळ, शहाजी सोनवणे, महादेव जाधवर,डॉक्टर राळेभात व समस्त वडार समाज संघटनेच्या वतीने या दिंडीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. या वेळी सुजाता लवांडे मुंबई तर सातेफळ येथे राजेंद्र भोसले, आजिनाथ लटके, मोहन भोसले, सावळा भोसले, मच्छिंद्र भोसले, अप्पा भोसले, अशोक भोसले व समस्त गावकऱ्यांनी या दिंडीचे स्वागत केले.वंजारवाडी येथे रावसाहेब खोत व समस्त गावकरी मंडळींनी या दिंडीचे स्वागत केले.तर तरडगाव फाटा येथे पंचशील युवा मित्र मंडळाच्या वतीने या दिंडीचे स्वागत करण्यात आले. सोनेगाव येथे लखन मिसाळ आणि संघर्ष ग्रुपच्या वतीने त्याचबरोबर महिला मंडळाच्या वतीने या दिंडीचे स्वागत करण्यात आले. तर धनेगाव येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने या दिंडीचे स्वागत करण्यात आले. सरपंच सिध्देश्वर शेंडकर, मिठू परकड, बलभीम परकड, अण्णा शिकारे,राहुल दातळ, विकास गोपळघरे, वैजिनाथ पाटील, भीमराव सुरवसे, कैलास जाधवर, बबलू सुरवसे, प्रवीण सदाफुले यांच्यासह खर्डा, सातेफळ, वंजार वाडी, तरडगाव व सोनेगाव येथील महिला व पुरुष सहभागी झाले होते.

दिंडी मार्गावर महिलांनी सडा, रांगोळ्या, फुलांचा वर्षाव, पाय धूनी व औक्षण करून या दिंडीचे स्वागत केले.सोनेगाव येथे संघर्ष ग्रुपच्या वतीने तोफांची सलामी देत लखन मिसाळ मित्र मंडळाने या दिंडीचे स्वागत केले. तर सातेफळ येथे लाला वाळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ब्रास बँड लावून विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या प्रांगणात या दिंडीचे स्वागत केले. शाही थाटातील या दिंडीचे सर्वच ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.

दिंडीच्या यशस्वीतेसाठी विशाल पवार, सचिन भिंगारदिवे, भगवान राऊत , संतोष चव्हाण, नंदकुमार गाडे,ऋषिकेश गायकवाड, राजू शिंदे, रजनी आवटी, लता सावंत,व्दारका पवार,काजोरी पवार, सुनीता बनकर, रोहिणी राऊत, उज्वला मदने, मामिता पावरा, नरसिंग भोसले, तुकाराम पवार, शीतल काळे, गणपत कराळे ,अतुल ढोणे,प्रवीण सदाफुले, शहानुर काळे,राहुल पवार,यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

चौकट :- भारतीय संविधानाची प्रत, प्रास्ताविका, संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्म निरपेक्षता ही मूल्ये अधोरेखित करणारे फलक, सामाजिक प्रबोधनपर, घोषवाक्ये हाती घेतलेले महिला व पुरुष कार्यकर्ते भगव्या पताका हाती घेऊन टाळ मृदंगाच्या निनादात विठू नामाचा गजर करीत सहभागी झालेले समतेच्या वारकऱ्यांनी दिंडी मार्ग फुलून गेला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here