जामखेड न्युज——
स्कॉलरशिप व नवोदय परीक्षेचे काटेकोर नियोजन करा- गटविकास अधिकारी प्रकाश पोळ
शालेय विद्यार्थ्यांना बाल वयात दर्जेदार शिक्षण मिळाले तर हेच चिमुकले भविष्यात डॉक्टर, इंजिनिअर, वकिल, अधिकारी होतील त्यामुळे जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी स्कॉलरशिप व नवोदय परीक्षेचे काटेकोर नियोजन करावे अशा सूचना गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिल्या.
पोळ यांनी गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी व केंद्रप्रमुख यांची आढावा बैठक घेऊन सदर सूचना दिल्या आहेत. जामखेड तालुका अवर्षणप्रवण तालुका असून या तालुक्यातून शेकडो लोक मोलमजुरीसाठी स्थलांतर करून जात असतात. अशा परिस्थितीत त्यांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण आपण दिले तर ती मुले भविष्यात अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील होतील व आपल्या पायावर चांगल्या पद्धतीने उभे राहतील.
त्यामुळे उद्याच्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असतील तर आज त्यांचा स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम झाला पाहिजे. त्यासाठी तिसरी ते पाचवी आणि सहावी ते आठवी अशा सर्व वर्गाच्या वर्ग शिक्षकांनी सकाळी साडेनऊ ते साडेदहा अशा वेळेमध्ये स्कॉलरशिप व नवोदय परीक्षेचे ज्यादा तास घ्यावे अशा सूचना श्री आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी असे श्री पोळ यांनी सांगितले.
त्याचबरोबर शिक्षकांचे प्रशासनाकडे प्रलंबित असणारे अनेक विषय होते त्याचाही सविस्तर आढावा घेऊन वरिष्ठ वेतनश्रेणी, वैद्यकीय देयके, पुढील अभ्यासक्रमास परवानगी देणे, सेवा पुस्तक अद्ययावत करणे, गोपनीय अहवाल पूर्ण करणे अशा पद्धतीचे कामे प्रशासनाने विशेष शिबिर घेऊन ऑगस्ट अखेर पूर्ण करावे असेही सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. यावेळी गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब धनवे, विस्तार अधिकारी चव्हाण सर, जाधव सर तसेच सर्व केंद्रप्रमुख हजर होते.