जामखेड न्युज——
आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या यात्रेसाठी धाकटी पंढरी (धनेगाव ) येथे भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – भरत (बप्पा) काळे
पंढरपुरला जाणे शक्य झाले नाही अशा भाविक भक्तांनी जामखेड तालुक्यातील धाकटी पंढरी धनेगाव येथे आषाढी एकादशी निमित्त यात्रेसाठी यावे असे आवाहन विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट धाकटी पंढरी धनेगावचे अध्यक्ष भरत बप्पा काळे यांनी केले आहे.
धाकट्या पंढरीची अख्यायिका
एक विठ्ठलभक्त माई पाटील या दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीच्या वारीला जायची, परंतु वृध्दावस्थेत थकल्यानंतर तिला जाणे शक्य होत नव्हते अशा वेळी स्वत: त्या भक्ताला पांडुरंगाने दृष्टांत देऊन सांगितले की, ‘तुला पंढरीस येण्याची गरज नाही मीच धनेगाव येथे आलेलो आहे’, अशी अख्यायिका धनेगाव येथील मध्यभागी असलेल्या या मंदिराच्या निर्मितीची सांगण्यात येते. या स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे जवळील डोहात शोधले असता तिथे स्वयंभू विठोबा रुखमाईच्या मूर्त्या सापडल्या ग्रामस्थांनी याच मूर्त्यांची स्थापना या मंदिरात केली. सध्या मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात त्यामुळे धनेगाव हे धाकटी पंढरी म्हणून प्रसिद्ध पावले आहे.
मंदिराची रचना-
पूर्वी हे मंदिर म्हणजे १० खणाची इमारत होती परंतु नंतर भक्तांच्या सहकार्यातून या मंदिराचे बांधकाम २ सभामंडप व मुख्य गाभारा असे करण्यात आले. याच मंदिराला लागून मोठे मैदान आहे.
आषाढी व कार्तीकी एकादशीला येथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात.
प्रत्येक एकादशीला इथे कीर्तन संपन्न होते.
गावात सामाजिक एकोपा
शेजारी हनुमान मंदिर आहे.
जवळच एक मजिद आहे. या ठिकाणी गणी महेबुब शेख हे सेवा करतात तसेच आषाढी एकादशी निमित्त मंदिरात मंडप तसेच लाईट याचे काम ते करतात यामुळे गावात सामाजिक एकोपा आहे. सर्व सण दोन्ही धर्माचे लोक गुण्यागोविंदाने साजरे करतात.
धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या धनेगाव येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांचा मोठा मेळा भरतो यासाठी आषाढी एकादशी दिवशी गुरूवारी दि. २९ रोजी पहाटे पाच वाजता आमदार रोहित (दादा) पवार, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, प्रा. मधुकर राळेभात, प्रा. सचिन गायवळ यांच्या हस्ते महापुजा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी दिवसभर अनेक भाविक भक्तांसह अधिकारी व पदाधिकारी भेट देत असतात. ट्रस्ट च्या वतीने सर्व भाविकांच्या फराळाची सोय करण्यात येते.
धाकटी पंढरी धनेगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट असुन याचे अध्यक्ष भरत (बप्पा ) काळे आहेत, उपाध्यक्ष दत्तात्रय काळे, सचिन काळे, सचिव बबनराव भोसले, खजिनदार संतोष काळे, संचालक लक्ष्मण लव्हाळे, जयसिंग जाधव, बाळासाहेब टिपरे, पद्माकर काळे, उत्तम भोसले, हिरालाल देशमुख, गणेश काळे, महादेव जाधव, कायदेशीर सल्लागार म्हणून अँड अनिल काळे काम पाहतात तर मुख्य सल्लागार म्हणून प्रा. मधुकर राळेभात, प्रा. सचिन गायवळ आहेत.
गेल्या सतरा वर्षांपासून जामखेड ते धनेगाव धाकटी पंढरी येथे दरवर्षी पायी दिंडीचे आयोजन प्रा मधुकर राळेभात यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येते दि. २८ मे रोजी जामखेड शहरातील मोरेवस्ती येथून निघणार आहे.