जामखेड न्युज——
बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने होणे हा बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे – नवनाथ पडळकर
बारामती येथील नव्याने सुरू झालेले ‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती असे करण्यात आले सदरची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून जाहीरपणे केली असून तशा प्रकारचा जीआर देखील कालच 31 मे रोजी जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नवनाथ पडळकर यांनी दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून नवनाथ पडळकर हे या नावासाठी सरकार पातळीवर पाठपुरावा करत होते. या विषयावर त्यांनी उच्च आरोग्य शिक्षण मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः जातीने या विषयात लक्ष घालून अहिल्यादेवींच्या नावासाठी सरकारकडे आग्रह धरला त्यामुळेच 31 मे रोजी सदर नावाची घोषणा करून जीआर निघाला.
नुकतेच भारतीय जनता पक्षामध्ये प्रदेश सचिव पदाची जबाबदारी मिळालेले पडळकर यांनी आपल्या नवीन डावाचा श्रीगणेशा बारामती मधील या एका ऐतिहासिक निर्णयाने केला. यातूनच सरकार दरबारी त्यांच्या शब्दाला वजन असल्याचे दिसून येते.
जामखेड न्युजशी बोलताना नवनाथ पडळकर म्हणाले की, होळकरशाहीचा दैदिप्यमान इतिहास, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा लोककल्याणकारी कारभार हाच शिंदे फडणवीस सरकारचा आदर्श असून असे अनेक धडाकेबाज निर्णय सरकार येत्या वर्षात घेणार आहे. राज्यातील अनेक सामाजिक संघटना तसेच पुणे जिल्हा, बारामती परिसरातील समाज बांधवांनी या निर्णयाची जोरदार स्वागत केले असून लवकरच या संदर्भातील जाहीर कार्यक्रमाची घोषणा आम्ही करू अशी माहिती नवनाथ पडळकर यांनी दिली.