जामखेड न्युज——-
अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
व्यासपीठाचे नियोजन कोलमडले खासदारांना बसण्यासाठी खुर्चीच नव्हती
अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चौंडीत केली तसेच दोन वर्षांनी येणारी ३००वी जयंती जगाला अभिमान वाटेल अशी करू अशी घोषणा केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर २९८ व्या जयंती निमित्त चौंडीत आज शासकीय जयंती साजरी करण्यात आली यावेळीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, आमदार, बबन पाचपुते, मोनिका राजळे, सुरेश धस, आण्णासाहेब डांगे, गोपीचंद पडळकर यांच्या सह अनेक नेते व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने आम्ही काम करत आहोत. गोरगरीब जनतेसाठी काम करत आहोत. ज्यांनी चौंडीत गेल्या वर्षी राजकारण केले त्यांचे सरकार पडले इतकी पवित्र माती या ठिकाणची आहे. अहिल्यादेवी यांचे कर्तृत्व हिमालयाएवढे आहे. आता जिल्ह्यला नाव मिळाल्याने देशात जिल्ह्याचा लौकिक वाढणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी जी प्रशासकीय संरचना उभारली हा देशासाठी मोठा अनमोल ठेवा आहे
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,
अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायप्रिय शासन चालवले राज्यात पायाभूत सुविधा निर्माण केल्या
हुंडाबंदी धोरण दारूबंदी धोरण राबवले तसेच
अखिल भारतीय वैद्यकांना एकत्र घेऊन क्षयरोग नियंत्रण केले. मंदिर जिर्णोद्धार स्वतः च्या तिजोरीतून केला अहिल्यादेवी होळकर नसत्या तर मंदिरे दिसली नसती.
अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेत आमचे सरकार काम करत आहे एकही धनगर बेघर राहु देणार नाही तसेच धनगर वाडी वस्ती पर्यंत डांबरी रस्ते बनवणार असेही फडणवीस यांनी सांगितले.
तसेच बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव जाहीर केले असल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली
कार्यक्रमाचे आभार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मानले.
यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका कर्तृत्ववान महिलाचा सन्मान करण्यात आला.