जामखेड न्युज——
युपीएससी परीक्षेत देशात पहिल्या चार क्रमांकांवर मुलीच, आमदार तांबे यांचा महिला शक्तीला सलाम
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं आमदार तांबे यांनी केलं कौतुक
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून यात देशात अव्वल चार क्रमांकांवर मुलींचा दबदबा आहे. याच नारी शक्तीला सलाम करत आमदार सत्यजीत तांबे यांनी या पहिल्या चार यशस्वी मुलींसह सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. समाजाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये मुलींची वाटचाल जोमाने सुरू असल्याचं हे द्योतक आहे. या मुलींच्या यशामुळे इतर अनेक जणींना प्रेरणा मिळेल, अशी प्रतिक्रिया आमदार तांबे यांनी व्यक्त केली.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार असलेले सत्यजीत तांबे यांनी सातत्याने शिक्षण, रोजगार या विषयांबाबतच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठीही आ. तांबे यांनी सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक समजली जाते. देशातील प्रतिभावान तरुण-तरुणीच त्यात उत्तीर्ण होता. संपूर्ण देशाचा प्रशासकीय गाडा या तरुणांच्या हाती असतो, याकडे आमदार तांबे यांनी लक्ष वेधलं. या परीक्षेत अखिल भारतीय पातळीवर इशिता किशोर, गरिमा लोहिया, उमा हरिती एन. आणि स्मृती मिश्रा या चार तरुणींनी पहिले चार क्रमांक पटकवल्याबद्दल आमदार तांबे यांनी त्यांचं अभिनंदन केलं. महिलांना त्यांचे मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं, तर त्या चमत्कार घडवू शकतात. ही नारी-शक्ती आहे. आता या यशस्वी विद्यार्थिनींना प्रशिक्षणादरम्यान पैलू पडतील आणि पुढे देशाच्या प्रशासनाचा कारभार त्या अत्यंत प्रभावीपणे पार पाडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
समाजाच्या काही घटकांमध्ये अजूनही महिलांना प्राथमिक सोयी-सुविधांसाठी झगडावं लागतं. अजूनही त्यांना दुय्यम वागणूक मिळते. पण या निकालानंतर असा संघर्ष करणाऱ्या सर्वच मुलींना प्रेरणा मिळेल, असं तांबे यांनी स्पष्ट केलं.
कश्मीरा संख्येचंही कौतुक
UPSC परीक्षेत राज्यातून पहिला आणि अखिल भारतीय स्तरावर २५ वा क्रमांक पटकावणाऱ्या ठाण्याच्या कश्मीरा संख्ये हिचंही आमदार तांबे यांनी कौतुक केलं. तिच्याशिवाय राज्यातून या परीक्षेत यश मिळवणाऱ्या सर्वच तरुणांची पाठ थोपटायला आमदार तांबे विसरले नाहीत. महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना राज्यभरातील ७०० तरुण-तरुणी त्या संघटनेत विविध पदांवर होते. त्यापैकी तरुणींची संख्या फक्त पाच एवढी होती. ही विषमता मला तेव्हाही खूप खुपायची. माझ्या कालावधीत मी ती संख्या ३३ टक्क्यांवर नेण्यात यशस्वी झालो, याचं मला समाधान वाटतं. मुलींना सुरक्षित वाटेल, असं वातावरण तयार करणं ही पहिली पायरी असते, असं आमदार तांबे या वेळी म्हणाले.
अयशस्वी विद्यार्थ्यांनाही सल्ला
यंदाच्या परीक्षेत यशाला गवसणी न घालू शकलेल्या विद्यार्थ्यांनाही आमदार तांबे यांनी धीर दिला. अपयशामुळे वाईट वाटणं स्वाभावीक आहे. पण त्यामुळे खचून जाणं हे पराभूताचं लक्षण आहे. पुन्हा एकदा पाटी कोरी करून जोमाने अभ्यासाला लागा. अपयशाच्या रेघोट्या पाटीवर तशाच ठेवल्या, तर नवीन अक्षरं गिरवता येणार नाहीत. अत्यंत शांतपणे हे अपयश पचवून यशासाठी नव्याने तयारी करा, असा सल्ला आमदार तांबे यांनी दिला.
तांबे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या संगमनेरमधील विद्यार्थ्यांचेही अभिनंदन केले. यामध्ये मंगेश खिल्लारे या अवघ्या 23 वर्षांच्या तरुणाचा समावेश आहे. विशेष बाब म्हणजे मंगेशने हे यश अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्राप्त केलं आहे. मंगेशचे वडील चहा विक्रेते असून त्याची आई ही विड्या वळण्याचे काम करते. मंगेशव्यतिरिक्त संगमनेरमधून राजश्री देशमुख आणि स्वप्नील डोंगरे यांनीही लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांचेही सत्यजीत यांनी अभिनंदन करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.