जामखेड न्युज——
बाजार समिती निवडणुकीत आमदार रोहित पवारांना धक्का!!! काँग्रेसचा भाजपला पाठिंबा
आमदार रोहित पवार मित्रपक्षांना विचारत नाहीत – शहाजीराजे भोसले
जामखेड बाजार समिती निवडणुकीत आमदार रोहित पवारांनी आमची फसवणूक केली असा गंभीर आरोप करत काँग्रेसने राष्ट्रवादीची साथ सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. जामखेड काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले यांनी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.जामखेड काँग्रेसच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला मोठे भगदाड पडले आहे.
आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारसभेचे जामखेड तालुक्यातील डिसलेवाडी येथे बुधवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभा सुरू असतानाच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले आणि युवक काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी राहूल उगले हे आपल्या सहकाऱ्यांसह सभास्थळी दाखल झाले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले यांनी बाजार समिती निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याची घोषणा केली. यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि उपस्थित मतदारांनी काँग्रेसच्या भूमिकेचे उत्स्फूर्त स्वागत केले.
बाजार समिती निवडणुकीत भाजपला काँग्रेसने पाठिंबा का दिला ? यावर भूमिका मांडताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले म्हणाले की, गेल्या अडीच तीन वर्षांपासून आमदार रोहित पवार यांच्या खांद्याला खांदा लावून प्रामाणिकपणे महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम केलं.पण बाजार समिती निवडणुकीत आमदार रोहित पवारांकडून आम्हाला अपमानास्पद वागणूक मिळाली, स्वाभिमानी माणसं त्यांची ही वागणूक कधीच सहन करू शकत नाहीत.आम्हाला उमेदवारी मिळाली नाही याचं दु:ख नाही. तसेच आम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून आम्ही भाजपला पाठिंबा देत नाहीत, तर आम्हाला आमदार रोहित पवारांनी फसवलं,जामखेडकरांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आम्ही भाजप सोबत जात आहोत, असे यावेळी राजेभोसले यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना शहाजी राजेभोसले म्हणाले की, वेळोवेळी मिटींगला बोलवून तुम्ही एवढ्या जागा घ्या, तेवढ्या जागा घ्या, एवढे फाॅर्म भरा,आम्हाला पाच जागा दिल्या, पाचच्या चार केल्या, ठिकयं, पण 19 तारखेला आमदार रोहित पवार आम्हाला बोलले की,आपल्याला सहकारात राळेभात बंधूंसोबत युती करायचीय,त्यांना जास्त जागा देयच्यात, तुम्ही तीन जागा घ्या आणि कामाला लागा, आम्ही कामालाही लागलोत, परंतू दुसर्या दिवशी उमेदवारांची जी लिस्ट आली त्यात काँग्रेसचं एकही नाव नव्हतं, हा अपमान माझा नाही तर माझ्या पक्षाचा त्यांनी अपमान केला. आम्हाला काँग्रेस पक्ष म्हणून आमदार रोहित पवारांनी जी वागणूक दिली ती वागणूक योग्य वाटली नाही, कोणाला कमी लेखलं नाही पाहिजे, आमची फसगत झाली.म्हणून आम्ही भाजपच्या पॅनलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेस पक्ष टिकावा म्हणून आम्ही संघर्ष करतोय. काही मिळावं म्हणून आम्ही कधीच कोणाच्या दारात गेलो नाही. ज्यांच्याबरोबर मागील अडीच तीन वर्षांपासून खांद्याला खांदा लावून कामं केलं त्यांच्याकडूनही कधीच एखादं काम मिळावं अशी अपेक्षा केली नाही. आमचे नेते बाळासाहेब थोरात हे महसूलमंत्री असताना पाणंदची कामे आली होती, तेव्हाही कधी आम्ही एक रूपयाची अपेक्षा केली नाही, एवढं निस्वार्थीपणे काम करून जर आम्हाला तुम्ही फसवत असाल, जामखेड तालुका हा स्वाभिमानी आहे, तुम्ही जे वागत आहात ते इथे चालणार नाही, ज्यांना तुम्ही सोबत घेऊन चालला आहात ते विधानसभेला आमच्या बरोबर नव्हते, म्हणून आता आम्ही तुमच्यासोबत नाही, तुमच्यासाठी आम्ही जिवाचं रान केलं, पण तुम्ही आमची केलेली फसवणूक आम्ही कधीच विसरणार नाही,असा हल्लाबोल यावेळी राजेभोसले यांनी केला.
राजेभोसले पुढे म्हणाले की, जामखेड बाजार समिती ही संस्था टिकली पाहिजे. एकाच घरात पाच पाच पदे देण्याइतपत मोठी संस्था आपल्या तालुक्यात नाही. सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. म्हणूनच काँग्रेस पक्ष आज भाजपच्या पॅनलला पाठिंबा देत आहे. अशी घोषणा यावेळी त्यांनी केली.