जामखेड न्युज——
दत्तवाडी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
हिंगोली येथील ‘अनाथांची माय’ मीरा कदम यांचा विशेष गौरव
तालुक्यातील धोंडपारगाव येथील जि.प.प्रा.शाळा दत्तवाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन सोमवार दि.३ एप्रिल २०२३ रोजी मातोश्री मंगल कार्यालय राजेवाडी येथे तालुक्याचे कार्यक्षम गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन हिंगोली जि.प.च्या आदर्श शिक्षिका तथा ज्येष्ठ समाजसेविका ‘अनाथांची माय’ सौ.मीरा धनराज कदम यांनी केले.स्वतः दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही ‘सेवासदन’ प्रकल्पाच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील तब्बल ७० मुलांचे शिक्षण व पालन पोषण करणा-या मीरा कदम यांचा यावेळी मानपत्र देऊन शाळेच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.
विविध प्रेरणादायी नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारे एक पवित्र गुरूकुल म्हणजे दत्तवाडी शाळा असे गौरवोद्गार गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी काढले,तर विद्यार्थ्यांचे अप्रतिम कलागुणदर्शन, नेटके नियोजन, शिक्षकांची कल्पकता आणि पालक व ग्रामस्थांचे सहकार्य पाहून आपण भारावून गेल्याचे मत मीरा कदम यांनी व्यक्त केले.यावेळी श्रीगणेशवंदना, वारकरी दिंडीनृत्य, राजा शिवछत्रपती, दमलेल्या बाबाची कहाणी, कृष्णलीला, लेझीमनृत्य, गोंधळगीत,पुलवामा दहशतवादी हल्ला,पोताडान्स,लावणी इ.विविध प्रकारच्या दर्जेदार कार्यक्रमांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली.
धोंडपारगावसह पंचक्रोशीतील शेकडो शिक्षण व कलाप्रेमी नागरिकांसह तालुक्यातील शिक्षकबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी सेवासदनमधील वंचित बालकांसाठी धान्य व रोख रकमेच्या स्वरूपात मोठी मदत जमा झाली,तर विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव झाला.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून परिविक्षाधीन गटविकास अधिकारी राजेश कदम,गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे,विस्तार अधिकारी सिद्धनाथ भजनावळे, केंद्रप्रमुख बाबासाहेब कुमटकर व मुकुंदराज सातपुते तसेच स्वच्छ विद्यालय स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त आदर्श शाळा बसरवाडीचे मुख्या.एकनाथ चव्हाण आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पाडळीच्या समूदाय आरोग्य अधिकारी डाॅ.जान्हवी काळे इ.मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मनोहर इनामदार यांनी तर आभार प्रदर्शन सहशिक्षक हरिदास पावणे यांनी केले.सूत्रसंचालन खडकत शाळेतील उपक्रमशील शिक्षक विठ्ठल तोरडमल व काकडेवस्ती शाळेचे मुख्या. विजय जेधे यांनी केले,तर अमृता बळीराम शिंदे व उत्कर्षा नागेश धुमाळ या माजी विद्यार्थीनींनी त्यांना अनमोल साथ दिली.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशिलकुमार धुमाळ, उपाध्यक्ष मारूती सराफ व चव्हाणवस्ती शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक अतुल मुंजाळ यांच्यासह सर्व पालकवृंदानी विशेष परिश्रम घेतले.
चौकट
गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांची संवेदनशीलता जामखेड तालुक्याचे कार्यक्षम गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटक तथा हिंगोली येथील ‘अनाथांची माय’ असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका मीरा धनराज कदम यांच्या ‘सेवासदन’ प्रकल्पासाठी ५००० रू.ची रोख मदत केली,तर मीरा कदम यांच्या सेवाभावी कार्याच्या विशेष गौरवार्थ प्रदान केलेल्या मानपत्राचे अस्खलितपणे वाचन करणा-या दत्तवाडी शाळेतील कु.श्रावणी मारूती सराफ या इ.१लीच्या विद्यार्थिनीस ५०० रू.बक्षीस देऊन आपल्यातील सामाजिक भान जपणा-या संवेदनशील मनाचे दर्शन घडविले.