जामखेड न्युज——
जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी विक्रमी ७७ अर्जाची विक्री झाली एकुण १२७ अर्ज
जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दोन दिवसांत पन्नास अर्जाची विक्री झाली आहे. सोमवारी १३ तर मंगळवारी ३७ अर्ज तर आज बुधवारी ७७ अर्ज विक्री झाली आहे तीन दिवसात १२७ अर्जाची विक्री झाली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३ एप्रिल आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एफ. निकम आहेत.
विविध कारणांमुळे जामखेड बाजार समितीची निवडणूक गेल्या काही महिन्यांपासून रखडली होती. बाजार समितीचा कारभार प्रशासकाद्वारे सुरु होता. बाजार समितीची निवडणूक कधी जाहीर होणार याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या. 20 मार्च 2023 रोजी अंतिम मतदारयादी जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
या निवडणुकीत आमदार प्रा.राम शिंदे विरूध्द आमदार रोहित पवार हा संघर्ष पुन्हा तापताना दिसणार आहे. असे असले तरी जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात व रत्नदिप मेडिकल फाउंडेशनचे डॉ. भास्करराव मोरे यांची भुमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. दोन्ही आमदारांविरोधात अमोल राळेभात तगडी लढत देऊ शकतात अशी मतदारांमध्ये चर्चा आहे.
बाजार समितीची निवडणूक दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात तगडे पॅनल उतरवण्यासाठी दोन्ही नेत्यांचा वजनदार उमेदवारावर डोळा असणार आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना दोन्ही नेत्यांची पसंती असणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होताना दिसणार आहे. निष्ठावंतांना न्याय देत असतानाच बाजार समितीचा नावलौकिक वाढवू शकणार्या अभ्यासू चेहर्यांना संधी देण्यावर दोन्ही नेत्यांचा भर असु शकतो अशी चर्चा आहे. असे असले तरी बाजार समितीवर आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी हाती घेतली आहे.
18 जागांसाठी होणार निवडणूक
जामखेड बाजार समितीची निवडणूक 18 जागेसाठी होणार. यामध्ये कृषि पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघातून 11 सदस्य निवडले जाणार आहेत. या मतदारसंघात सर्वसाधारण 7, महिला राखीव 2, इतर मागास प्रवर्ग 1, विमुक्त जाती / भटक्या जाती 1 असे उमेदवार निवडले जाणार आहेत. तर ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी या मतदारसंघासाठी 4 जागा आहेत. यामध्ये सर्वसाधारण 2, अनुसूचित जाती जमाती 1 आणि आर्थिक दुर्बल घटक 1 असे सदस्य निवडले जाणार आहेत. व्यापारी / आडते मतदारसंघासाठी 2 जागा आहेत. हमाल/ मापाडी मतदारसंघासाठी 1 जागा आहे. असे एकुण 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधक जामखेड हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.
जामखेड बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम खालील प्रमाणे
उमेदवारी अर्ज दाखल करणे – 27 मार्च 2023 ते 3 एप्रिल 2023 ( वेळ – सकाळी 11 ते दुपारी 3) ठिकाण – निवडणूक कार्यालय
अर्ज छाननी – 5 एप्रिल 2023 ( सकाळी 11 वाजता) ठिकाण – निवडणूक कार्यालय
वैध अर्जाची यादी प्रसिद्ध करणे – 6 एप्रिल 2023 ( सकाळी 11 वाजता ) निवडणूक कार्यालय व संस्था नोटीस बोर्ड
अर्ज मागे घेण्याची तारीख – 6 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 ( सकाळी 11 ते दुपारी 3) निवडणूक कार्यालय
चिन्ह वाटप – 21 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता ( निवडणूक कार्यालय व संस्था नोटीस बोर्ड)
मतदान – 30 एप्रिल 2023 ( वेळ सकाळी 8 ते 4 ) स्थळ नंतर घोषित करण्यात येईल
निकाल – 30 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता ( स्थळ व तारीख नंतर घोषित करण्यात येईल)
निकाल घोषणा – मतमोजणी दिवशी ठिकाण व निकाल तारीख जाहीर करण्यात येईल.