जामखेड न्युज——
आई-वडिलांच्या हातातला कोयता सोडवण्यासाठी जिद्दीने अभ्यास करत संतोष खाडे एमपीएससीत एनटीडी संवर्गातून पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण
बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट गावच्या संतोष खाडेच्या यशाची जोरदार चर्चा आहे. ऊसतोड कामगाराच्या मुलाने एमपीएससीच्या निकालात एनटी-डी प्रवर्गातून पहिला क्रमांक मिळवलाय. आई-वडिलांच्या हातातला कोयता सोडवण्यासाठी हे यश महत्त्वाचं असल्याचं संतोषने सांगितलं. संतोषचे आई-वडील गेल्या ३० वर्षांपासून ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रात जातात. संतोषला बालपणी ऊसाच्या फडात रहावं लागलं. अधिकारी झाल्यानंतर ऊस तोड कामगारांच्या मुलांसाठी काम करण्याची इच्छा संतोषने बोलून दाखवली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं नुकत्याच जाहीर केलेल्या MPSC परीक्षेच्या निकालात संतोष खाडे राज्यातून सर्वसाधारण यादीत 16 व्या, तर एनटीडी संवर्गातून पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झालाय.
संतोष मूळचा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाटचे रहिवासी आहे. त्याचे आई-वडील गेल्या 30 वर्षांपासून ऊसतोडीला जात होते. यंदा मात्र त्यांच्या हातातील कोयता थांबला आहे.
आता पंचक्रोशीत या दोघांनाही क्लास वन अधिकाऱ्याचे आई-वडील म्हणून ओळखलं जातं. पण संतोषसाठी मात्र ते त्याचे अक्का आणि बापूच आहेत. ज्यांनी मोठ्या हिंमतीनं संतोषला शिकवलं आणि क्लास वन अधिकारी केलं.
काय म्हणतात संतोष खाडे?
नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या राज्यसेवा 2021 मध्ये माझा 16 क्रमांक आला आहे आणि एनटीडी प्रवर्गातून प्रथम क्रमांक आलेला आहे. अजून कुठलीही पोस्ट किंवा पद निश्चित झालेले नाही. मात्र थोड्याच दिवसात लोकसेवा आयोग जाहीर करतील. माझ्या यशाचे सर्व श्रेय मी माझ्या आई-वडिलांना देतो. कारण त्यांनी फार कष्ट करून मला शिकवले. ते ऊस तोडणी कामगार आहेत. त्यांनी मी शिक्षण घेत असताना मला कुठलीही अडचण येऊ दिली नाही आणि मी हे शिक्षण पूर्ण करू शकलो. एमपीएससीमध्ये मला घवघवीत यश मिळवता आले. सर्व मित्र कंपनीचा या माझ्या यशामध्ये वाटा आहे. त्यांनी माझे मनोबल उंचावल्याने परीक्षेत यश मिळू शकले.