जिल्ह्यात जामखेड प्रथम तर कर्जत दुसऱ्या क्रमांकावर

0
122

 

जामखेड न्युज——

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत कर्जत-जामखेडचा डंका; जामखेड पहिल्या तर कर्जत जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर

लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या योग्य समन्वयाचा सकारात्मक परिणाम

 

कर्जत आणि जामखेड हे दोन तालुके पूर्वी दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखले जायचे. परंतु आता ही ओळख पुसली जाऊन या ना त्या कारणाने कर्जत-जामखेड तालुके राज्यस्तरावर आपले नावलौकिक मिळवत आहेतच. शिवाय नुकतेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये जामखेड व कर्जत जिल्हा स्तरावर अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर आले आहे.

रोजगार हमी योजना राबवण्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गटविकास अधिकारी यांचा गुणगौरव समारंभ यशवंतराव चव्हाण केंद्र नरिमन पॉईंट येथे राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड व कर्जत येथील गटविकास अधिकारी श्री. प्रकाश पोळ आणि श्री. अमोल जाधव यांचा देखील नामोल्लेख आवर्जून करण्यात आल्याने ही प्रत्येक कर्जत-जामखेडकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

मागील दोन वर्षात कर्जत-जामखेड तालुक्यामध्ये वॉल कंपाऊंड, सिमेंट रस्ते, पेविंग ब्लॉक रस्ते, पानंद रस्ते, वृक्ष लागवड, सिंचन विहिरी, गाय गोठे/ शेळीपालन शेड, फळबाग अशी नाविन्यपूर्ण कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यात करण्यात आली आहेत. याचा फायदा हा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना झाला असून त्याची दखल शासन दरबारी देखील घेण्यात आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा समन्वय योग्य असेल तर नक्कीच कोणतीही अडचण आडवी येत नाही उलट कामे मार्गी लागण्यास त्याचा फायदा होतो. त्याचेच एक उत्तम उदाहरण सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच अधिकारी कार्यक्षम आणि कल्पक असतील तर नक्कीच अशा प्रकारची यशाची शिखरे पार करण्यात कोणताही अडथळा येत नाही.

जामखेडमध्ये २ लाख ३१ हजार ७४५ मनुष्य दिनाची निर्मिती करून ११.९७ कोटी रुपये खर्च करून गट विकास अधिकारी प्रकाश पोळ व सहकारी टीमने उत्तम कार्य करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच कर्जतमध्ये १ लाख ८८ हजार ९८ मनुष्य दिनाची निर्मिती करून गटविकास अधिकारी अमोल जाधव आणि त्यांच्या संपूर्ण टीमने उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली आहे. त्याबद्दल कामाची पोचपावती म्हणून त्यांची दखल शासनाकडून देखील घेण्यात आली. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनीही अधिकारी उत्तम कार्य करत असल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करून कौतुक केलं आहे.

प्रतिक्रिया –
मागच्या २ वर्षात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघात नाविन्यपूर्ण कामे करून गट विकास अधिकारी पोळ साहेब व जाधव साहेब यांनी उत्कृष्ट जबाबदारी पार पाडत मतदारसंघाची मान उंचावली आहे, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!, चांगले अधिकारी मतदारसंघात असतील तर सामान्य लोकांचा फायदा होतो. परंतु काही लोक चांगल्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यातच जास्त रस ठेवतात. अशाच पद्धतीचे उत्तम काम महसूल विभागाच्या अंतर्गत प्रांताधिकारी अजित थोरबोले साहेब आणि दोन्ही तहसीलदार यांच्या माध्यमातून झालं आहे.

आमदार रोहित पवार
(कर्जत – जामखेड विधानसभा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here