जामखेड न्युज——
जामखेडचा पुढारी वड आज होणार इतिहास जमा
या झाडांची पुर्नलागवड (ट्री-ट्रांसलोकेटिंग ) करावयास हवी होती.

पुढारी वड काय नाव ऐकून आश्चर्य वाटले ना? हो, वाटणारच कारण या झाडाचे चक्क नामकरण झालेले आहे. कित्येक घडामोडींचा साक्षीदार आहे. कित्येक गुपिते त्याच्या साक्षीने घडलेली आहेत. त्याच्या सावलीत स्थानिक राजकारणी ते राज्य पातळीवरील राजकारणी तसेच मोठ मोठे सेलिब्रिटी शिक्षक, पत्रकार, सरपंच, ठेकेदार येथे विसावलेले आहेत. त्याच्या साक्षीने अनेकांनी खलबते केलेली आहेत. जामखेड वरून मराठवाड्यात किंवा मराठवाड्यातून पुणे मुंबई कडे जाणारे अनेक मान्यवर तसेच सामान्य लोकही या वडाखाली चहा घेतल्याशिवाय पुढे जात नव्हते असा हा अनेक वर्षाचा इतिहास असणारा वड आज इतिहास जमा होत आहे. पर्यावरण संरक्षण करण्यासाठी आपण सर्व जामखेड करांनी या झाडांची पुर्नलागवड करण्यासाठी प्रयत्न करावयास हवे होते.

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला देव मानले जाते किंबहुना प्रत्येक गोष्टीत देव असतो . . अशा महान संस्कृती झाडांना तर विशेष देवत्व बहाल केलेले आहे . असाच एक जामखेड शहराच्या जीवनाचा जगण्याचा एक अपरिहार्य भाग बनलेला, इतिहासाच साक्षीदार स्वतःच एक इतिहासातील दंत कथा बनणार आहे.

स्थानिक राजकारण ते जागतिकीकरण असा मोठा कॅनव्हास असलेल्या विषयावर या ठिकाणी चर्चा झडलेल्या असतात . प्रत्येक माणसाला या वडाखाली स्वतःचे हक्काचे व्यासपीठ या वडाने उपलब्ध केले होते. येथे येऊन बंडू ढवळे यांचा चहा अनेकजण आवडीने गप्पा मारत कट कारस्थाने करत. वेगवेगळ्या योजना आखत घेत.
तालुक्यातील सामान्य माणूस आठवडी बाजाराला आल्या नंतर याच्या सावलीत विसावून कौटुंबिक चर्चा करत तर कधी या वडाखाली कित्येकांचे संसार ही फुलले आहेत . कित्येकांच्या लग्नाची बोलणीचा तो मध्यस्थ आहे तर कित्येक सासुरवाशीणींच्या पाठवणी साठीचा पुढाकार घेणारा कर्ता ही आहे . त्याच्या साक्षीने कित्येक कोटींची आर्थिक देवाण घेवाण ही झाली आहे . आठवडी बाजाराला आल्यानंतर कित्येकांचे हक्काचा थांबा म्हणजे पुढारी वड होता .असा हा खूप साऱ्या गोष्टींची गुपिते आपल्या पोटात घेऊन आज स्वतःच एक इतिहास होणार आहे.
माणसाच्या भौतिक विकासाच्या संकल्पनाना मूर्त रुप देण्यासाठी नैसर्गिक काही गोष्टींचा त्याग हा अपरिहार्य आहे त्यामुळेच आता राष्ट्रीय महामार्गातील बाधा म्हणून या पुढारी वडाचा अंत आज होत आहे.
जामखेड तालुका भाजपाचे शहराध्यक्ष बिभीषण धनवडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी काल वडाची विधिवत पुजा केली.
वडाबद्दल प्रत्येक जणांने आपापल्या आठवणी सांगितल्या पण आपल्या देशात झाडांची पुर्नलागवड करण्याचे तंत्र असताना या वडाची दुसऱ्या ठिकाणी लागवड का झाली नाही यासाठी कोणी पुढाकार का घेतला नाही.
महामार्गाच्या कामामुळे जे जे झाडे जातात त्या सर्व झाडांची पुर्नलागवड करता आली असती व पर्यावरणाची हाणी झाली नसती. पुढारी वडाबद्दल नाते सांगणाऱ्या जामखेड करांचा वडही राहिला असता. यासाठी सर्वानी प्रयत्न करावयास हवे होते.
आपल्या शेजारी राज्यातील आंध्र प्रदेश येथील
हैद्राबादचे रामचंद्र अप्पारी ह्यांनी ट्री-ट्रांसलोकेटिंगच्या माध्यमातून आजवर हजारो झाडांना वाचवले आहे. ट्री-ट्रांसलोकेटिंग एक अशी टेक्निक आहे ज्याद्वारे एका झाडाच्या ८० टक्के फांद्या आणि पानं कापले जातात. ह्या नंतर उरलेल्या झाडाला मुळासकट काढून त्याला दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरीत केल्या जाते.
स्थानांतरीत करण्याची ही टेक्निक २००० वर्ष जुनी आहे. ह्याची सुरवात इजिप्त येथे झाली होती. दिवेशात आजही ह्याच टेक्निकचा वापर करून अनेक झाडांना वाचवल्या जाते आपण जामखेड करांनी प्रयत्न केले असते तर नक्कीच आपणही झाडांना वाचवू शकलो असतो.





