जामखेड न्युज——
सत्ता नसतानाही शासकीय निधी मिळवण्यात आमदार रोहित पवार जिल्ह्यात अव्वल

सत्ता नसतानाही आ. रोहित पवार शासकीय निधी मिळवण्यात जिल्ह्यात अव्वल; कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी त्यांनी पाठपुरावा केलेल्या नवीन व मागील शासन काळातील जुन्या कामांना मिळून 12.07 कोटींचा भरघोस निधी मंजूर

नेहमीच कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमदार रोहित पवार यांनी डिसेंबर-2022 च्या हिवाळी अधिवेशनातही मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करून घेत आपल्या कामाचा सपाटा सुरूच ठेवल्याचं पाहायला मिळालं. जामखेड येथे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यालय स्थापन व्हावे यासाठी रोहित पवार यांनी वारंवार पाठपुरावा केला होता व सदरच्या कामास महाविकास आघाडी सरकारच्या काळात 27 जून 2022 रोजी प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली होती. या इमारतीच्या कामास डिसेंबर 2022 च्या पुरवणी अर्थसंकल्पात 1 कोटी 71 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.
यासोबतच महाविकास आघाडी सरकारच्या काळात मार्च 2022 मध्ये मंजूर असलेल्या नाबार्ड योजनेअंतर्गत रस्ते व पुलाच्या कामांसाठीचा उर्वरित निधी तिसऱ्या टप्प्यातील तरतूद 6 कोटी 37 लाख रुपये, जुलै 2021 व मार्च 2022 या कालावधीत मंजूर असलेल्या कर्जत येथील 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व कर्मचारी निवासस्थाने तसेच जामखेड येथील 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व कर्मचारी निवासस्थाने इत्यादी इमारतींकरिता 4 कोटी रुपये अशा एकूण नवीन व जुन्या कामांना मिळून 12 कोटी 7 लाख रुपये एवढा भरघोस निधी प्राप्त झाला आहे. यापूर्वी पावसाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात 15 कोटींचा निधी आमदार रोहित पवार यांना मंजूर झाला होता.
या माध्यमातून सत्ता नसतानाही आमदार रोहित पवार मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावण्यासाठी धडपड करत असल्याचे दिसून येत आहे. त्याचेच फलितरूप म्हणून विरोधात असतानाही आता एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यात त्यांना यश आले आहे. याबरोबरच सुजय विखे यांच्या मागणीनुसार कर्जत व जामखेड तालुक्यात ५ कोटींचे रस्ते व राम शिंदे यांच्या मागणीनुसार कर्जत व जामखेड तालुक्यात ३ कोटी रुपयांची रस्ते मंजूर झाली आहेत.
चौकट
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत महाविकास आघाडी सरकार असताना कर्जत व जामखेडचे 150 कोटींचे प्रस्ताव मंत्रालयात पाठवले होते ते ही टप्प्याटप्प्याने मंजूर होत जातील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.




