जामखेड न्युज——
राष्ट्रवादीचे आऊटगोंइग तर भाजपात इनकमिंग सुरूच!!!! राजुरी पाठोपाठ गिरवलीतही राष्ट्रवादीला खिंडार
तालुक्यातील राजुरी पाठोपाठ गिरवली गावात राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडले असून, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. जामखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचा मोठा उद्रेक उफाळून आला आहे. याचा पहिला उद्रेक राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या राजुरीत झाला. राजुरीतील २०० कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करून, आठवडा उलटत नाही तोच आता तालुक्यातील आणखीन एका गावात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राजुरी पाठोपाठ गिरवलीतही राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे.
२०१९ च्या विधानसभेत निवडणुकीनंतर कर्जत-जामखेड मतदारसंघात गेल्या अडीच तीन वर्षांत आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ न देण्याची घेतलेली भूमिका, हुजरेगिरी, कानफुके, चमकोगिरी, जनाधार नसलेल्या कार्यकर्त्यांचा आमदार पवारांभोवती वाढलेल्या गराड्यामुळे गावोगावचे निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले गेले. ज्यांनी पवारांच्या विजयासाठी जिवाचं रान केलं त्यांनाच पवारांच्या यंत्रणेकडून डावलले जाऊ लागले. यातून मतदारसंघात प्रचंड नाराजी वाढली. याचाच परिणाम आऊटगोंइग सुरू झाली आहे.
याचा उद्रेक आता तालुक्यात होऊ लागला आहे. राजुरीतील २०० कार्यकर्त्यांनी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपात प्रवेश केला. या प्रवेशानंतर राष्ट्रवादीला आता आणखीन एक धक्का बसला आहे. गिरवली येथील २५ कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
गिरवली येथील राष्ट्रवादीच्या २५ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा आमदार राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी पार पडला. आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत गिरवली येथील गोविंद सुदाम खोसे, अक्षय खोसे,दत्ताभाऊ खोसे, गणेश मुरलीधर खोसे, महेंद्र मनोहर खोसे, किरण दळवी, अभिजीत शिंदे, शुभम खोसे, अभिषेक संजय खोसे, उमेश भाऊ चौधरी, अरुण हनुमंत शेळके, राहुल वाल्हेकर, अनिल शेळके, अभिषेक अंगद खोसे, अनिकेत वाल्लेकर यांच्यासह तब्बल २५ युवक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादीचे गावोगावचे कार्यकर्ते पक्षांतराच्या भूमिकेत आले आहेत. हे कार्यकर्ते थेट आमदार राम शिंदे यांच्याशी संपर्क साधून, भाजपात प्रवेश करू लागले आहेत. आगामी २०२४ ची विधानसभा निवडणुक आणि त्या अगोदर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि बाजार समिती निवडणूकीच्या दृष्टीने आमदार राम शिंदे यांची राजकीय ताकद वाढू लागली आहे. भाजपात सुरू झालेले इनकमिंग राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.