जामखेड न्युज——
सावधान!!! जामखेड तालुक्यात 894 जनावरांना लंपीची बाधा, 26 जनावरांचा मृत्यू.
लंपी स्किन आजाराबाबत पशुपालकांनी काळजी घ्यावी- गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

महाराष्ट्रात सर्वत्र लंपी स्किन आजाराने थैमान घातले असून पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मागील दोन-अडीच महिन्यांपासून जामखेड तालुक्यातही लंपीचा शिरकाव झाला आहे.
जामखेड तालुक्यात गायवर्गीय 58891 जनावरे आहेत. २ सप्टेंबर रोजी जामखेड तालुक्यातील मोहरी या गावात श्री. हरिदास गोपाळघरे यांच्या गायीला सर्वात आधी लंपीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यानंतर विविध गावात ही संख्या वाढत जाऊन आजवर बाधित पशूंची संख्या 894 वर पोहचली आहे. यापैकी 521 जनावरे बरे झाले असून 347 जनावरांवर उपचार सुरू आहेत तर 26 जनावरांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.

दि. १ ऑक्टोबर रोजी बोरले या गावातील श्री. आबासाहेब काकडे यांची गाय लंपीची पहिली शिकार ठरले. यानंतर आजवर तालुक्यातील २६ जनावरांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी 20 जनावरांचा नुकसानभरपाई प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्याचा विचार करता कोपरगाव तालुक्यात सर्वात कमी रुग्ण व मृत्यू असून यानंतर जामखेड तालुक्याचा क्रमांक लागतो. आरणगाव, पाटोदा,खामगाव, भवरवाडी, हळगाव या कर्जत तालुक्याला लागून असलेल्या भागात तुलनेने लंपीचा जास्त प्रादुर्भाव दिसून येत आहे.

जामखेड तालुक्यातील 100% गायवर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून तुलनेने प्रादुर्भाव कमी आहे. तरीही पशुपालकांनी काळजी घ्यावी. घाबरून न जाता तात्काळ पंचायत समिती, पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पशुसंवर्धन विभागाला संपर्क साधावा.
-डॉ. संजय राठोड,पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती जामखेड.
पंचायत समिती प्रशासन लंपीबाबत पूर्ण काळजी घेत आहे. गावागावात कीटकनाशकांची फवारणी वरचेवर चालू आहे. माझा गोठा, स्वच्छ गोठा ही मोहीम प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. आपल्या गोठ्याची दैनंदिन स्वच्छता ठेवावी. डासांपासून जनावरांचे रक्षण करावे.
-प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती जामखेड.



