जामखेड न्युज——
देवस्थानच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी भूखंड माफियांविरोधात, गुन्हे दाखल करण्याचे खंडपिठाचे आदेश

बीड जिल्ह्यातील देवस्थानच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी भूखंड माफियांविरोधात, गुन्हे दाखल करण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. यामुळे भूखंड माफियांचे धाबे दणाणले आहेत.

तक्रारदाराचे निवेदनच एफआयआर म्हणून गृहीत धरावे, असे देखील यामध्ये म्हटलंय. यामुळे भूखंड माफीया असणाऱ्या राजकीय व्यक्तींसह माफीयांचे धाबे दणाणले आहेत. आणि यामध्ये आता कोणा कोणावर पोलीस गुन्हे दाखल करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आष्टी तालुक्यातील विठोबा देवस्थान, मुर्शदपूर, विठोबा देवस्थान, पांढरी, विठोबा देवस्थान, खडकत, खंडोबा देवस्थान, बेलगाव, श्रीरामचंद्र देवस्थान, आष्टी, श्रीरामचंद्र देवस्थान, चिखली, श्रीरामचंद्र देवस्थान, चिंचपूर व पिंपळेश्वर देवस्थान, आष्टी या देवस्थानांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणात आधी फौजदारी गुन्हे नोंद करा व नंतर तपास करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिलेली तक्रारच एफआयआर म्हणून ग्राह्य धरावी, असेही म्हटले आहे.

बीड जिल्ह्यात वक्फ बोर्डच्या जमीन घोटाळ्यानंतर हिंदू देवस्थानच्या जमिनीची बेकायदेशीर हस्तांतरणाची 8 प्रकरणे समोर आली होती. त्यानंतर याचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला होता. मात्र एसआयटीने अहवाल दिल्यावरही फौजदारी कारवाई न झाल्याने राम खाडे यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. या याचिकेवर न्या. मंगेश पाटील आणि न्या. अभय वाघवसे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली.

सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांनी जिल्ह्यात प्रशासनाला हाताशी धरून देवस्थान जमिनीचे घोटाळे झाले आहेत. वक्फच्या प्रकरणात गुन्हे दाखल झाले. मात्र, हिंदू देवस्थानच्या करीत नाहीत, ते गुन्हे दाखल करावेत अशी आग्रही मागणी केली. यावर आता तक्रारदाराचे निवेदनच एफआरआय म्हणून गृहीत धरून, फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.
दरम्यान या आदेशाने आता भूखंड माफीया असणाऱ्या राजकीय व्यक्तींसह माफीयांचे धाबे दणाणले आहेत. आणि यामध्ये आता कोणा कोणावर पोलीस गुन्हे दाखल करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



