मराठा क्रांती मोर्चातील चेहरा शिवसंग्रामचे नेते संजीव भोर शिंदे गटात राष्ट्रवादीला लक्ष्य कि विखेंना आव्हान?

0
221

जामखेड न्युज——

मराठा क्रांती मोर्चातील चेहरा शिवसंग्रामचे नेते संजीव भोर शिंदे गटात

राष्ट्रवादीला लक्ष्य कि विखेंना आव्हान?

 

मराठा क्रांती मोर्चातील ( Maratha Kranti Morcha) अग्रणी चेहरा आणि शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील (Sanjeev Bhor Patil) यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. प्रत्यक्षात निवडणुकीला अजून अवधी असला तरी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे या दोघांकडून आपापले गट मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

संजीव भोर हे त्यांच्या अभ्यासू व आक्रमक भाषण शैलीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत. मागील वीस वर्षांपासून ते सामाजिक चळवळीत सातत्याने सक्रिय राहिलेले आहेत. मराठा समाजाच्या प्रश्नांसह पाणी प्रश्न, शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब, प्रकल्पग्रस्त, शेतजमीन कुळांचे प्रश्न अशा समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय देण्यासाठी संजीव भोर पाटील यांनी आक्रमक आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवलेला आहे. नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अमानुष कृत्य जगासमोर आणण्यासाठी पहिले प्रभावी आंदोलन भोर यांनी केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेल लक्ष्य?

दरम्यान, संजीव भोर यांच्या रुपानं एकनाथ शिंदे यांनी एकाच महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील दुसरा मोठा नेता पक्षात आणला आहे. नुकतचं राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि ठाणे ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेत फुट पाडल्यानंतर पुढचं लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेस आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

विखे पाटील यांना आव्हान?

संजीव भोर पाटील यांच्यारुपानं शिंदे यांचं अहमदनगर जिल्ह्यात भाजपला आणि प्रामुख्याने विखे पाटील कुटुंबीयांना आव्हान देण्याचा प्रयत्न आहे का? असाही सवाल विचारला जात आहे. कारण संजीव भोर पाटील यांना विखे पाटील कुटुंबियांचा पारंपारिक विरोधक म्हणून ओळखलं जातं. २०१९ साली त्यांनी सुजय विखे पाटील यांच्या विरोधात अहमदनगर दक्षिणमधून त्यांनी लोकसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता.

शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण अंगीकारून बाळासाहेबांची शिवसेना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते नक्की प्रयत्न करतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला. भोर यांचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षात स्वागत करून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी खासदार भावना गवळी, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे, मराठा मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम, शिवप्रहार संघटनेचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून दोन्ही गटांकडून पक्षबांधणीवर लक्ष देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here